उच्च माध्यमिक शाळेसाठी नवीन इमारत बांधणार
पणजी: पेडणे सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या इमारतीचा अहवाल सादर करण्यास झालेल्या विलंबाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सद्यस्थितीत जीर्ण झालेल्या इमारतीची तात्पुरती दुरुस्ती करून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार जीत आरोलकर यांनी उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याची माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली आहे.
पेडणे उच्च माध्यमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून तिची यापूर्वीच दुरुस्ती होणे गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. तसेच अहवाल सादर करण्यासही विलंब झाला. मात्र आता, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पेडणे उच्च माध्यमिक शाळेच्या इमारतीची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असून दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होईल. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर, जुनी इमारत पाडली जाईल. पेडणे उच्च माध्यमिक शाळेची इमारत १९७५ साली बांधण्यात आली होती.
पेडणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून जागे अभावी ४०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर, प्रवेश बंद करण्याची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणून, एक नवीन सुसज्ज इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
५० लाख खर्चून दुरुस्ती होणार
नवी इमारत तयार होईपर्यंत वर्ग घेणे शक्य व्हावे यासाठी ५० लाख रुपये खर्च करून इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली. त्यांनी पालक शिक्षक संघाचे सदस्य, उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राहेश्री रेडकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली.