अंदाजे १० लाखांचे नुकसान
म्हापसा : कुचेली म्हापसा येथे साईबाबा मंदिराजवळ गवताला लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी प्रवासी बस झाली. या दुर्घटनेत सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी १३ रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली.
दुर्घटनाग्रस्त जीए ०१ यू ५२१० क्रमांकाची अंबा ट्रॅव्हल्स ही बस म्हापसा - पणजी मार्गावर धावते. बस मालक नितीन मांद्रेकर (रा. पर्वरी) यांनी या बसचे कोलवाळ येथील एका गॅरेजमध्ये नुतनीकरणाचे काम केले होते. नविन कुशन्स सीट कव्हर आणि इतर लहानसान डागडुजीच्या कामाचा यामध्ये समावेश होता.
गॅरेजमधून काढून ही बस घटनास्थळी साईबाबा मंदिराच्या समोरील पठारावर पार्क केली होती. या पठारावरील सुकलेल्या गवताला लागलेली आग पसरली व ती बस पर्यंत पोचली आणि काहीक्षणात बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत येथील उपस्थित इतरांनी या ठिकाणीच पार्क केलेली वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र बसचा चालक घटनास्थळी नसल्याने ती आगीच्या झळीपासून सुरक्षितस्थळी नेणे शक्य झाले नाही.
काहीवेळात आगीने संपुर्ण बसला वेढले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. तो पर्यंत संपुर्ण बस आगीत खाक झाली होती. कुणीतरी सिगारेट पेटवून फेकल्यामुळे गवताने पेट घेतल्याचा ही आग लागल्याचा अंदाज रहिवास्यांनी व्यक्त केला आहे. म्हापसा अग्निशमन दलाचे हवालदार रणजित गावकर, जयेश कांदोळकर, अशोक वळवईकर, अक्षय सावंत व भगवान पाळणी या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. म्हापसा पोलीस हवालदार सुदेश नाईक यांनी पंचनामा केला.