पेडणे : कोरगाव येथील वृद्धेच्या बागायतीतील पोफळी आणि माडांची अज्ञातांकडून कत्तल

समाजविघातक घटकांवर कारवाई करावी : स्थानिकांची मागणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th January, 02:47 pm
पेडणे : कोरगाव येथील वृद्धेच्या बागायतीतील पोफळी आणि माडांची अज्ञातांकडून कत्तल

पणजी : गावडेवाडा-भटवाडी कोरगाव येथे सावित्री गावडे या वृद्ध महिलेच्या बागायतींमधील २८ पोफळी आणि २ माडांची काही अज्ञातांकडून कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



हाती आलेल्या माहितीनुसार, सावित्री गावडे या ठिकाणी आपल्या मुलीसह राहतात. गेल्या बारा वर्षांपासून त्यांची मुलगी आणि त्याच या बगायतीची काळजी घेतात. दरम्यान आज उत्तर रात्री २ वाजता  काही अज्ञातांनी सदर बागायतीमध्ये येत तब्बल २८ पोफळी तसेच २ माडांची नासधूस केली. आज सकाळी सावित्री गावडे झाडांना पाणी देण्यासाठी आल्या असता त्यांना ही बाब समजली. त्यांनी येथील स्थानिकांना याबाबत माहिती दिल्यानंतर काहीजण येथे आले. 




एका माहितीनुसार, काही समाजविघातक घटकांचा या भागात वावर आहे. काही युवक रात्री अपरात्री स्थानिकांच्या बागायतीतील अननस-काजू-पोफळी-आंबे-नारळ लांबवतात तर कधी उगाच झाडांची मोडतोड करतात. आदीच या भागातील बागायतदार आणि शेतकरी जंगली जनावरांच्या वावरामुळे हतबल झाला असताना, या असामाजिक घटकांच्या अशा वागण्यामुळे ते आणखीनच हवालदिल झाले आहेत. काहीजण येथे येणाऱ्या पर्यटकांना वाटेत अडवून विनाकारण त्रास देखील देतात. अनेकदा स्थानिकांच्या गाड्या देखील त्यांनी फोडल्या आहेत.अशाच गोष्टी करून त्यांना थ्रिल मिळते असे एकजण म्हणाले. 



दरम्यान याच युवकांपैकी काही जणांचे नाव तीन वर्षांपूर्वी हरमल येथे किनाऱ्यावर झालेल्या एका खून प्रकरणात समोर आले होते. या युवकांमुळे येथील स्थानिक त्रासलेले आहेत पण याबाबत पुढे येऊन बोलण्यास कुणी राजी होत नाही. त्यामुळेच या घटकांचे फावते. दरम्यान येथील स्थानिक आणि सदर बागायतदार वृद्धेने पोलिसांनी रात्रीच्यावेळी या भागात किमान एकदा तरी गस्त घालावी अशी मागणी केली आहे. त्याच बरोबर सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. 


हेही वाचा