कामगिरीनुसारच पगारवाढ मिळणार
दिल्लीः ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर बीसीसीआय खेळाडूंच्या कामगिरीवर करडी नजर ठेवणार असून खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पगार देण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना 'काम तसे दाम' हा नियम लागू होणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासह आढावा बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे.
त्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आढावा बैठकीत काही मोठे निर्णय घेतले गेले असून आता क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी देखील कडक नियम करण्यात आले आहेत.
• खेळाडूंना त्यांच्या कामगिरी सुधारावी लागेल अन्यथा त्यांना पूर्ण पगार दिला जाणार नाही. कॉर्पोरेट हाऊसमध्ये ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीनुसार पगारवाढ दिली जाते, तसाच नियम आता भारतीय क्रिकेटमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.
• नवीन नियमानुसार एखादा दौरा ४५ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची असेल, तर खेळाडूंच्या कुटुंबाला फक्त १४ दिवस त्या दौऱ्यावर राहण्याची परवानगी असेल आणि जर हा दौरा कमी दिवसांचा असेल तर कुटुंबियांसाठी हा कालावधी ७ दिवसांचा असू शकतो.
• नव्या नियमानुसार कुटुंबीय संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंसोबत राहू शकत नाहीत. काही खेळाडू टीम इंडियाच्या बसमधून प्रवास करत नसल्याचे दिसले. त्यांच्यासाठी आता सर्व खेळाडूंना संघासोबत एकाच बसमधून प्रवास करावा लागेल, असा नियम लागू करण्यात आला आहे.
• गौतम गंभीरच्या वैयक्तिक व्यवस्थापकाला व्हीआयपी बॉक्स किंवा टीम बसमध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये राहावे लागेल. जर खेळाडूंचे सामान १५० किलोपेक्षा जास्त असेल तर बीसीसीआय खेळाडूंना अतिरिक्त सामानाचे शुल्क देणार नाही.