गोवा : भविष्यात गोव्यात मेट्रो प्रकल्प येणार : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
13th January, 03:55 pm
गोवा : भविष्यात गोव्यात मेट्रो प्रकल्प येणार : मुख्यमंत्री

पणजी : राज्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत सध्या नियोजन स्तरावर काम सुरू आहे. भविष्यात गोव्यात मेट्रो रेल्वे येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. सोमवारी गोवा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण खात्यातर्फे आयोजित यंग लीडर काँक्लेव्ह या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आर्यन खेडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत अनौपचारिक संवाद साधला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबाबत प्राथमिक टप्प्यात काम सुरू आहे. याबाबत आम्ही प्रस्ताव तयार करत आहोत. तसेच भारतीय रेल्वे व अन्य केंद्रीय खात्यांसोबत चर्चा सुरू आहेत. पुढील काही काळात मेट्रो रेल्वे गोव्यात येणार आहे. सध्या गोव्यात ५० ते ६० आयटी कंपन्या काम करत आहेत. गोव्यात सध्या तरी आयटी हब नाही. असे असले तरी भविष्यात राज्यात आयटी हब करण्याचा आमचा विचार आहे. 

एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात नर्सिंगचे बहुतेक विद्यार्थी बीएससी करून नोकरी करतात. यामुळे एमएससी नर्सिंग धारकांची संख्या कमी आहे. सध्या राज्याला एमएससी नर्सिंग केलेल्या लोकांची गरज आहे. बीएससी प्रमाणे एमएससीला शिष्यवृत्ती नाही. तरी विद्यार्थ्यांची मागणी असेल तर मुख्यमंत्री अप्रेंटीशिप योजने अंतर्गत एमएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत विचार करू. 

ते म्हणाले, सरकारने नुकतेच राज्यात ४० ठिकाणी मोफत वायफाय हॉट स्पॉट सुरू केले आहेत. याचा विद्यार्थ्यांनी वापर करावा. पूर्वीच्या काळी माहिती मिळणे हे सहज शक्य नव्हते. आता मोबाईल किंवा इंटरनेटवर लगेच माहिती मिळू शकते. परंतु अनेक जण इंटरनेटवरील चांगल्या गोष्टी घ्यायचे सोडून वाईट गोष्टी तेवढ्याच घेतात. मोबाईल इंटरनेटचा वापर स्वतःच्या विकासासाठी करून घ्यायचा का नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. 

एकाच कॉम्प्लेक्स मध्ये तीन महाविद्यालये

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोवा विद्यापीठात २ लाख चौरस मीटर जागेत कॉम्प्लेक्स बांधण्याचा आमचा विचार आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये फार्मसी, आर्किटेक्चर आणि संगीत महाविद्यालय बांधण्यात येतील. फार्मसी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी पुढील सहा महिन्यात होणार आहे.


हेही वाचा