गोवा : केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करूनच मुख्यमंत्री घेणार मंत्रिमंडळ फेररचनेचा निर्णय

प्रदेश अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्याला संधी मिळायला हवी : सदानंद शेट तानावडे

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
13th January, 04:14 pm
गोवा : केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करूनच मुख्यमंत्री घेणार मंत्रिमंडळ फेररचनेचा निर्णय

पणजी : मंत्रिमंडळात फेरबदल व्हावी, असे मला वाटून उपयोग नाही. मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करूनच मुख्यमंत्री मंत्रिमंडळ फेररचनेबाबत निर्णय घेतील, असे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले. प्रदेश अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्याला संधी मिळायला हवी. भाजपच्या सर्व सच्च्या कार्यकर्त्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी पेलण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रुडंट वाहिनीला दिलेल्या हेड ऑन मुलाखतीत प्रदेश भाजप अध्यक्ष तसेच राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी हे प्रतिपादन केले.  मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू आहे. आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून व त्यांच्या मान्यतेनेच घ्यावा लागतो. मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेतील, असे ते म्हणाले. टूलकिट प्रकरणाबाबतही मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे.

२०२० साली मी अध्यक्षपदाची धूरा सांभाळली. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बऱ्याच निवडणुका झाल्या. पक्षाने त्या जिंकल्या. इतर पक्षांतील आमदारानीही पक्षात प्रवेश केला. यामुळे मंत्री, आमदारांशी माझे भावनिक नाते तयार झाले. या भावनिक नात्यातून मीच अध्यक्षपदी रहावे, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. तरीही नवीन चेहऱ्याना संधी मिळायला हवी. कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम मी पूर्वीसारखे करतच राहिन. २० जानेवारीपर्यंत नवीन अध्यक्षांची निवड होईल, असे ते म्हणाले. 

युतीच्या धर्माबाबत मगो नेत्यांना दिली समज निवडणुकीवेळी गोंधळ नको म्हणून मगो बरोबर युतीची चर्चा सुरू आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर मगो हा सरकाराचा भाग बनला. युतीची चर्चा सुरू असताना एखाद्या मतदारसंघावर जबाबदार व्यक्तीने दावा करणे अयोग्य आहे. प्रियोळ मतदारसंघावर दावा केल्यानंतर मगोच्या नेत्यांशी चर्चाही झालेली आहे. जागावाटपाची चर्चा निवडणुकीवेळी होईल. तत्यूर्वी एखाद्या मतदारसंंघावर दावा करू नका, असा समज मगोला देण्यात आलेला आहे. युतीची चर्चा सुरू असली तरी कोणत्याही मतदारसंघात पक्षाचे कार्य करण्यास हरकत नाही. मडकईत मगोचा आमदार असला तरी भाजपचे कार्य सुरू आहे. यामुळे मगोने सुद्धा कोणत्याही मतदारसंघात काम करायला हरकत नाही. 

दक्षिणेतील पराभवाची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी

विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत मात्र दक्षिणेत पराभव झाला. प्रदेश अध्यक्ष म्हणून याचा दोष माझ्यावर येतो व मी तो स्वीकारत आहे. विजयाबद्धलचा अतिआत्मविश्वास पक्षाला नडला. देशपातळीवर सुद्धा ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात २४० जागांवर विजय मिळाला. दक्षिणेतील पराभवाबद्धल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.  इतर पक्षातील आमदार तसेच कार्यकर्ते पक्षात आलेले आहेत. यातील काही आमदारांनी विचारसरणीचा स्वीकार करून पक्षाच्या कार्यात भाग घेण्यास सुरवात केलेली आहे. या प्रक्रियेत जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे, असे ते म्हणाले.


हेही वाचा