दोन्हीही पक्षांकडून संविधान अभियानाचे आयोजन
पणजी : संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरून सोमवारी भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात जास्त अपमान काँग्रेसने केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा निर्धार भाजपने केलेला होता. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना पूर्ण बहुमत न दिल्याचा दावा काँग्रेसने केला.
संविधान दिनानिमित्त सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यासह प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर आणि अॅड. यतीश नाईक यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.
भाजपला संविधानात बदल करायचा आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताची मागणी केल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आल्याचा दावा बाबू कवळेकर यांनी केला.
भारतीय संविधान आणि संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात जास्त अपमान काँग्रेसनेच केला. त्याकाळच्या निवडणुकांत काँग्रेसनेच डॉ. आंबेडकर यांना पराभूत केल्याचा आरोप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी केला.
भाजपच्या या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्र सोडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अपमान जनतेने पाहिलेला आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलायचे होते.
त्यासाठीच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींसह इतर नेत्यांनी स्पष्ट बहुमताची मागणी केलेली होती. पण, सुज्ञ जनतेने त्यांना डाव हाणून पाडला, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
भाजपतर्फे विविध कार्यक्रम
प्रदेश भाजपतर्फे राज्यभर संविधान गौरव अभियानास सुरुवात झाली असून, हे अभियान येत्या २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाबू कवळेकर यांनी दिली.
दरम्यान, प्रदेश काँग्रेसकडूनही येत्या २६ जानेवारीपासून पुढील वर्षभर राज्यभर संविधानाबाबत जागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक शनिवार आणि रविवारी गटपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.
पाटकरांचा भाजपला सवाल
केंद्रात सत्तेत असताना काँग्रेसने ज्या घटना दुरुस्त्या केल्या, त्या त्या-त्या राज्यांचा आणि तेथील जनतेचा विचार करूनच केल्या. गोव्याला स्वतंत्र राज्य, घटक राज्याचा दर्जा देत असताना तसेच कोकणीला राजभाषा करत असतानाही दुरुस्त्या ही झाल्या.
या दुरुस्त्या भाजपला मान्य नाहीत का, असा सवाल करत याचे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेने गरजेचे असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.