बेळगाव - चोर्ला घाट - गोवा सीमेपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण सुरू
पणजी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे चोर्ला घाटाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यघडीस पहिल्या टप्प्यात कुसमटी ते कणकुंबीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. हा रस्ता गोवा आणि कर्नाटक राज्यांतील जनतेसाठी अनेक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. गोव्याला कर्नाटकातून भाजीपाला-दूध आणि तत्सम गोष्टींचा पुरवठा याच मार्गाने होतो. पुढील टप्प्यातील बांधकाम हाती घेत प्राधिकरण रणकुंडये ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणार आहे. त्याचप्रमाणे येथील रस्त्यांचे डबल कोटींगही करण्यात येईल.
सध्या ४३.५ किलोमीटर लांबी असलेल्या रणकुंडये ते चोर्ला या रस्त्याच्या डांबरीकरणाची झालेली सुरुवात आणि कुसमळी आणि मलप्रभा नदीवर असलेला नूतन पुलाचे काम हाती घेण्यात आल्याने बेळगाव-चोर्ला-गोवा अशी होणारी आंतरराज्य वाहतूक बंद करण्याचे आदेश येथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे येथील अवजड वाहतूक ही सदर पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद असेल. चोर्ला मार्गावरील वाहतूक येत्या पावसाळ्यापर्यंत बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी २६.१३० कि. मी. ते ६९.४८० कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल.
दरम्यान शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कणकुंबी येथे रस्त्याचे भूमिपूजन करत कामाला चालना दिली होती. नंतर हुबळीतील बांधकाम कंत्राटदायर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही केली. परंतु कणकुंबी वनखात्याने रस्त्याच्या कामात तांत्रिक कारणांचा हवाला देत आडकाठी आणली होती. दरम्यान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्वरित जिल्हा वनाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले व चर्चेअंती रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कणकुंबी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात आले. काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचेही काम झाले आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत सदर रस्ता खुला करता येईल असा आशावाद येथील अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.
मलप्रभा नदीवरील पूल हा ब्रिटिशकालीन असून सध्या जिर्णावस्थेत आहे. येथील स्थानिक आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान सध्या हाती आलेल्या माहितीनुसार नवीन पूलासाठी वेगळा निधी उपलब्ध नसून, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी जो निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यातूनच नूतन मलप्रभा नदीवरील पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधण्यात येईल. माहितीनुसार हा पूल नव्वद मिटर लांब तर साडेपाच मिटर रुंद असेल. येत्या दोन दिवसांत जुना पुल पडण्याच्या हालचालींना वेग येईल. दरम्यान वाहतूक करणाऱ्यांची आबाळ होऊ नये यासाठी नदीत मातीचा भराव टाकत पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. या आठ कमानीच्या दगडी बांधकामाच्या जीर्ण पूलाला सुमारे सव्वाशे वर्षे झाली आहेत.
मुळात चोर्ला मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीचा ताण लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. याकामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे २७९ कोटींचा निधी मंजूर केला होता. दरम्यान पर्यावरण प्रेमी व वनखात्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आडकाठी आणल्याने हे काम थांबले. राष्ट्रीय महामार्ग कारवार विभागांतर्गत बेळगाव विभागीय राष्ट्रीय महामार्गाच्या सीपीसी मोडवर चोर्ला रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. हे काम झाल्यानंतर सर्वांसाठीच सोईस्कर असलेल्या चोर्ला मार्गावरुन वाहनचालक आपल्या ऐच्छिक स्थळी कमी वेळात पोहोचतील. पण वेग आणि चोर्ला घाटातील आडवळणी रस्ता हे नेहमीचेच धोकादायक समीकरण आहे. त्यामुळे वाहनचालकांना कायमच येथून वाहतूक करताना सावधगिरी बाळगावी लागेल.