गोवा : दृष्टीच्या जीव रक्षकांनी एका वर्षात वाचवले ६३९ जणांचे प्राण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th January, 11:58 am
गोवा : दृष्टीच्या जीव रक्षकांनी एका वर्षात वाचवले ६३९ जणांचे प्राण

पणजी : वर्ष २०२४ मध्ये राज्याची किनारपट्टी आणि दूधसागर धबधब्याजवळ घडलेल्या ७६४ घटनांमध्ये दृष्टीच्या जीवरक्षकांनी ६३९ जणांना बुडण्यापासून वाचवले. याशिवाय त्यांनी १५७ वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी प्रथमोपचार, १४६ जणांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे तसेच हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांची देणे अशा कार्यात महत्वाची भूमिका बजावली. २०२४ मध्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात आठ जणांचा मृत्यू  झाला.

२०२४ मध्ये दृष्टी जीवरक्षकांनी सुमारे ९५० लोकांना मदत केली. सन २०२३ मध्ये हीच संख्या ७०२ होती. एकूण ६३९ बचाव कार्यांत ४८७ भारतीय नागरिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक पर्यटक कर्नाटक (११९) आणि महाराष्ट्र (१०६) येथील होते. तसेच, बुडण्यापासून वाचवण्यात आलेल्या १२० परदेशी पर्यटकांमध्ये प्रामुख्याने रशियन (७०) आणि ब्रिटिश (१६) पर्यटक होते.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर १६४ घटनांसह जीवरक्षकांनी सर्वाधिक बचावकार्य केले, तर बागा समुद्रकिनाऱ्यावर १४७ आणि कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर ६६ घटनांची नोंद झाली. या बचावकार्यांसह उत्तर गोव्यात एकूण ५४५ घटनांची नोंद झाली. दक्षिण गोव्यात कोलवा समुद्रकिनाऱ्यावर ३८, पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर ३०, आणि दृष्टी जीवरक्षकांच्या देखरेखीखाली असलेल्या दूधसागर धबधब्यावर २२ घटनांची नोंद झाली.

२०२४च्या डिसेंबर महिन्यात सर्वाधिक घटना घडल्या, गोव्यात हा पर्यटनाच्या दृष्टीत सर्वात व्यस्त महिना, यात १४१ घटना घडल्या त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ११७ आणि नोव्हेंबरमध्ये ११३ घटना घडल्या. वयोमानानुसार पाहता २६ ते ३५ वयोगटातील २१५ लोकांना जीवरक्षकांच्या मदतीची गरज भासली. एकूण ९५० घटनांमध्ये, ६८० पुरुष आणि २६९ महिला यांचा समावेश होता.

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १३९ मुले कुटुंबीयांपासून हरवली होती. जीवरक्षकांनी  या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. जीवरक्षकांनी ४५ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १५७ जणांना प्राथमिक उपचार पुरवले. यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने जखमी झालेल्या २२ जणांना दिलेल्या मदतीचाही समावेश असलेल्या माहिती दृष्टी मरीनचे सीईओ नवीन अवस्थी यांनी दिली.


हेही वाचा