हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
प्रयागराज : सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते महेश कोठे यांचे मंगळवारी प्रयागगज येथील त्रिवेणी संगमावर स्नान करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जवळच्या मित्राने ही माहिती दिली. ते ६० वर्षांचे होते. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.
कोठे हे मकर संक्रांतीला अमृतस्नानासाठी त्रिवेणी संगमावर गेले होते. नदीच्या पाण्यात उतरल्याच्या काही क्षणानंतरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कोठे यांचे पार्थिव आज बुधवारी अंत्यसंस्कारासाठी सोलापुरात आणण्यात येणार आहे. कोठे यांनी २० नोव्हेंबर रोजी सोलापूर (उत्तर) येथून भाजपच्या विजय देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान कोठे यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. प्रयागराजमध्ये प्रचंड थंडी आहे. पाण्यातील थंडीच्या प्रभावामुळे त्यांना हा झटका आला असावा असा डॉक्टरांनी अंदाज वर्तवला आहे.
काल मकरसंक्रांतीचे औचित्य साधत जवळपास ९.३० कोटीहून अधिक भाविकांनी व विविध आखाड्यातील संतांनी पहिले अमृतस्नान घेतले. सकाळी ८.३० वाजेपर्यंत १.३८ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. कोठे यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.