शिवोली येथील वृद्धेला एक कोटींना गंडविणारे तिघे भामटे गजाआड

सायबर विभागाची केरळमध्ये कारवाई : डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
शिवोली येथील वृद्धेला एक कोटींना गंडविणारे तिघे भामटे गजाआड

पणजी : ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे शिवोली-बार्देश येथील ६८ वर्षीय  वृद्धेला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने केरळ येथून विषक आर, मोहम्मदशून सुलेमान आणि आंध्र प्रदेश येथून रोशन शेख या तिघांना अटक केली आहे.    या प्रकरणी शिवोली-बार्देश येथील बेर्नाडित फर्नांडिस (६८) या  वृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २६ ते २८ डिसेंबर रोजी अज्ञाताने तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप काॅल करून दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्याने तक्रारदाराच्या नावाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच तिच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. याशिवाय तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे पत्र आल्याची माहिती दिली.  तसेच तिला हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यात १ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले.       

या प्रकरणी सायबर विभागाने तपास केला असता, एसएन पुरम-विजयवाडा येथील एका दागिन्यांच्या दुकानाच्या बँक खात्यात ४० लाख जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, सायबर विभागाचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉ. भालचंद्र नाईक आणि महेश नाईक या पथकाने संशयित वेंकटेश्वरलू (५३) याला ताब्यात घेऊन अटक केली. 

तिघा संशयितांना अटक
सायबर विभागाने यरमला वेंकटेश्वरलूची चौकशी केली असता, केरळ येथून विषक आर, मोहम्मदशून सुलेमान या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले. तसेच तक्रारदार महिलेची काही रक्कम वरील संशयितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही उघड झाले. त्यानुसार त्या दोघांना ११ रोजी केरळ येथून अटक केली. त्या दोघांची आणि यरमला वेंकटेश्वरलू या संशयिताची चौकशी केली. त्यानुसार, यरमलाचे संबंधित बँक खाते रोशन शेख हाताळत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, रोशन शेखला १२ रोजी आंध्र प्रदेशातून अटक करून गोव्यात आणले. या प्रकरणात सायबर विभागाने तिघाजणांना  अटक केली आहे.      

हेही वाचा