पीडित महिलांनीच या दोघांची खरडपट्टी काढत त्यांना आधी चोप दिला व नंतर पोलिसांच्या हवाली केले.
म्हापसा : येथील आंतरराज्य बस स्थानकावर रोड रोमियोंनी पर्यटक महिलांची छेड काढत अश्लील शेरेबाजी केल्याची घटना घडली. दरम्यान या महिलांनी दोघांना येथेच्छ चोप दिला. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांना माहिती मिळताच बसस्थानकावर हजर होत त्यांनी झारखंडमधील दोघा संशयितांना अटक केली. सदर घटना आज सोमवारी सकाळी घडली.
संशयित रितल शॉ व गिरवार निरवाले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन्ही पर्यटक महिला सकाळी म्हापसा बस स्थानकावर उतरल्या. त्यावेळी येथे असलेल्या या दोघा संशयितांनी या महिलांना पाहून शेरेबाजी केली. याला आक्षेप घेत, पीडित महिलांनी संशयितांना जाब विचारला. तसेच संशयितांची चांगलीच खरडपट्टी काढून त्यांना चोप दिला. हा प्रकार पाहून बस स्थानकावर असलेल्या इतर प्रवासी लोकांनी देखील या संशयितांना प्रसाद दिला व नंतर त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी दोघांना बीएनएसएसच्या १७० अंतर्गत अटक केली.