डिचोली पोलिसांची कामगिरी : कर्नाटकातील हुबळी येथून सुटका
डिचोली : येथील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार डिचोली पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यानंतर डिचोली पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या सहा तासांत मुलीचा शोध लावून तिची कर्नाटकातील हुबळी येथून सुटका केली.
मोहम्मद शब्बीर बल्लारी यांनी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. बीएनएसच्या कलम १३७ (२) आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत एफआयआर नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांवर अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी तातडीने वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक देखरेखीचा वापर केल्यानंतर अपहरण केलेली मुलगी हुबळी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश गाडेकर यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक अमरनाथ पाळणी, विकेश हडफडकर, कॉन्स्टेबल विशाल आणि महिला कॉन्स्टेबल विजया यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
कर्नाटकातील हुबळी येथील बस स्टँडवरून सहा तासांत अल्पवयीन मुलीचा शोध यशस्वीरीत्या घेण्यात आला. त्यानंतर मुलीला गोव्यात परत आणण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश गडेकर व टीम अधिक तपास करत आहे.