गतिरोधकावरून उसळलेल्या कारच्या धडकेने जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

कळंगुटमधील डॉल्फिन सर्कल जंक्शनवर झाला होता अपघात


13th January, 12:12 am
गतिरोधकावरून उसळलेल्या कारच्या धडकेने जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कळंगुट येथे गतिरोधकामुळे पर्यटक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध दिशेने जात असलेल्या दुचाकीला कारची धडक बसली. या अपघातातील जखमी दुचाकीस्वार किशोर रावजी हळदणकर (५६, रा. सावतावाडा, कळंगुट) यांचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशमधील विजय शॉ (३७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात ३ जानेवारी रोजी दुपारी २.३१ च्या सुमारास कळंगुटमधील डॉल्फिन सर्कल जंक्शनवर झाला होता. किशोर हळदणकर आपल्या जीए ०३ व्ही ६६८१ क्रमांकाच्या दुचाकीवरून डॉल्फिन सर्कलपासून घरी निघाले होते. संशयित विजय शॉ एमपी ०९ झेडएम १७७८ क्रमांकाची कार घेऊन म्हापशाहून कळंगुटला जात होता. डॉल्फिन सर्कलनजीकच्या गतिरोधकाचा विजय शॉ याला अंदाज आला नाही. त्यामुळे कार गतिरोधकावरून उसळली आणि कारवरील त्याचे नियंत्रण सुटले. विरुद्ध दिशेने जाऊन कारने किशोर हळदणकर यांच्या दुचाकीला धडक दिली. कळंगुटचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार साळगावकर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारचालक विजय शॉ याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश कानोळकर करत आहेत.
उपचारादरम्यान गोमेकॉत निधन
या अपघातात दुचाकीस्वार किशोर हळदणकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रथम कांदोळी आरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवार, ११ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. 

हेही वाचा