म्हापसा : येथील आंतरराज्य बस स्थानकावर महाराष्ट्रातील पर्यटक महिलांची छेड काढून अश्लिल शेरेबाजी केल्याप्रकरणी पीडितांनी दोघा युवकांची बरीच खरडपट्टी काढत त्यांना चोप दिला. म्हापसा पोलिसांनी संशयितांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
रितल बिरंदर शॉ (३१, रा. झारखंड) व गिरिवर शुहताई निराळे (३०, रा. छत्तीसगड) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी १३ रोजी सकाळी घडली. पीडित दोघी महिला सकाळी म्हापसा आंतरराज्य बस स्थानकावर उतरल्या. त्यावेळी तिथे असलेल्या संशयितांनी या महिलांना पाहून शेरेबाजी केली. शिवाय संशयित आक्षेपार्ह व्हिडिओ पाहत होते. याला आक्षेप घेत पीडितांनी संशयितांना जाब विचारला.
त्यानंतर दोघाही संशयितांची चांगलीच खरडपट्टी काढली. हा प्रकार पाहून बस स्थानकावर असलेल्या इतर प्रवासी लोकांनी देखील या संशयितांना चोप दिला. नंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी संशयितांना भारतीय न्याय सुरक्षा संहितेच्या १७० कलमांतर्गत अटक केली.