धारबांदोड्यातील ‘त्या’ हायस्कूलच्या गेटला शाळा सुटताच लागणार कुलूप

मुलांना शिपायाकडून मारहाण झाल्यानंतर व्यवस्थापनाचा निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
धारबांदोड्यातील ‘त्या’ हायस्कूलच्या गेटला शाळा सुटताच लागणार कुलूप

हायस्कूलमधील अज्ञाताने फोडलेला सीसीटीव्ही कॅमेरा.

फोंडा : धारबांदोडा तालुक्यातील हायस्कूलच्या मैदानावर खेळणाऱ्या मुलांना रविवारी शिपाई प्रेमानंद गावडे यांनी मारहाण केल्याच्या प्रकरणाची दखल व्यवस्थापन समितीने घेतली असून सोमवारपासून संध्याकाळ ते सकाळी आणि सुटीच्या दिवसात पूर्णपणे गेटला कुलूप लावण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.


धारबांदोडा तालुक्यातील हायस्कूलच्या मैदानावर खेळणाऱ्या ४ मुलांना मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. यासंबंधी सोमवारी सकाळी हायस्कूलमध्ये जाऊन चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाली. रविवारी हायस्कूलमध्ये शिक्षण न घेणारे ८ अल्पवयीन मुले मैदानावर खेळण्याऐवजी हायस्कूलच्या व्हरांड्यात खेळत होते. तर हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मैदानावर खेळत होते. यापूर्वी सुटीच्या दिवसात हायस्कूलच्या आवारात घुसून अज्ञाताने सीसी टीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली होती. तसेच खिडक्याच्या काचा व रात्रीच्यावेळी पेटून ठेवण्यात येणारे विजेचे दिवे फोडण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे व्यवस्थापन समितीने हायस्कूलच्या शिपायांना सुटीच्या दिवसात अधूनमधून हायस्कूलमध्ये फेरफटका मारण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रविवारी शिपाई प्रेमानंद गावडे खास फोंड्याहून हायस्कूलमध्ये तपासणी करण्यासाठी गेला होता. रविवारी व अन्य सुटीच्या दिवशी हायस्कूल जवळील लोकवस्तीतील मोठ्या प्रमाणात महिला चालण्यासाठी मैदानावर जात होत्या. त्या महिलासाठी हायस्कूलची गेट खास खुली ठेवण्यात येत होती. पण, रविवारी घडलेल्या घटनेमुळे सोमवारपासून गेटला कुलूप लावण्यात आले असून फक्त शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी गेट खुली करण्यात येणार आहे.
शाळा व्यवस्थापन समितीची १६ रोजी बैठक
दि. १६ जानेवारी रोजी शाळा व्यवस्थापन समितीची खास बैठक होणार असून भविष्यात अज्ञाताकडून हायस्कूलच्या मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा