गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाची कामगिरी
पणजी : ‘डिजिटल अरेस्ट’ द्वारे शिवोली - बार्देश येथील ६८ वर्षीय वृद्धेला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने केरळ येथून विषक आर, मोहम्मदशून सुलेमान आणि आंध्रप्रदेश येथून रोशन शेख या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी शिवोली - बार्देश येथील बेर्नाडित फर्नांडिस (६८) या वृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २६ ते २८ डिसेंबर २०२४ रोजी अज्ञात व्यक्तीने तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल करून दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्याने तक्रारदाराच्या नावाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच तिच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. याशिवाय तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे पत्र आल्याचे माहिती दिली. तसेच तिला हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यात १ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले.
या प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास केला असता, एसएन पुरम-विजयवाडा येथील एका दागिन्यांच्या दुकानाच्या बँक खात्यात ४० लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, सायबर विभागाचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉ. भालचंद्र नाईक आणि महेश नाईक या पथकाने विजयवाडा येथून संशयित यरमला वेंकटेश्वरलू (५३) याला ताब्यात घेतला. त्यानंतर त्याला मंगळवार ७ रोजी गोव्यात आणून अटक केली. दरम्यान सायबर विभागाने त्याची चौकशी केली असता, केरळ येथून विषक आर, मोहम्मदशून सुलेमान हे दोघे या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. तसेच तक्रारदार महिलेची काही रक्कम वरील संशयिताच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे समोर आले.
त्यानुसार, सायबर विभागाने त्या दोघांना शनिवार ११ रोजी केरळ येथून अटक केली. त्या दोघांची आणि यरमला वेंकटेश्वरलू या संशयिताची चौकशी केली. त्यानुसार, यरमलाचे संबंधित बँक खाते रोशन शेख हाताळत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, संशयित रोशन शेख याला रविवार १२ रोजी आंध्रप्रदेशातून अटक करून गोव्यात आणले. या प्रकरणात आतापर्यंत सायबर विभागाने चार संशयितांना अटक केली आहे.