केळशीत दोन आठवड्यात १४ जणांना कुत्र्यांकडून चावे

पंचायतीकडून व्यावसायिकांची बैठक : कुत्र्यांना किनार्‍यावर अन्न न घालण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th January, 11:59 pm
केळशीत दोन आठवड्यात १४ जणांना कुत्र्यांकडून चावे

मडगाव : केळशी किनार्‍यावर भटक्या कुत्र्यांकडून पर्यटकांना चावे घेण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन आठवड्यात १४ घटना घडल्या असून सरपंच डिक्सन वाझ यांनी शॅक्स, हॉटेल व रेस्टॉरंट प्रतिनिधींची बैठक घेतली. पंचायतीकडून निश्चित जागांवर कुत्र्यांना जेवण द्यावे, किनारी भागात देऊ नये, असे आवाहन सरपंच वाझ यांनी केले.

पर्यटन हंगाम सुरू असतानाच केळशी पंचायत क्षेत्रातील समुद्र किनार्‍यावर भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याची प्रकरणे वाढत आहेत. केळशी सरपंच डिक्सन वाझ यांनी यापूर्वी कुत्र्यांच्या चाव्यामुळे पर्यटनाला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे मिशन रेबिजच्या संचालकांना पत्र पाठवून मार्गदर्शन व सहकार्याची मागणी केली होती. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या १४ घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पर्यटनासाठी देशी व विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनार्‍यांवरील साधनसुविधांसह पर्यटकांना मिळणार्‍या सोयींबाबत राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, किनारी भागातील पर्यटनाला अनेक समस्या भेडसावत आहेत. फिरत्या विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे केळशीतील भटक्या कुत्र्यांमुळे चावा घेण्याचे प्रकार कमी होण्याची गरज आहे. यासाठी सरपंच डिक्सन यांनी किनारी भागातील हॉटेल्स, शॅक्स, रेस्टॉरंटच्या प्रतिनिधींची बैठक घेत समस्या जाणून घेतली. उघड्यावर कुत्र्यांना अन्न घालण्यात येते व काही दिवस अन्न न मिळाल्यास कुत्रे आक्रमक होतात व चावा घेण्याचे प्रकार वाढत असल्याचे मत यावेळी पंच तथा मच्छीमार जिझस डिकॉस्टा व इतरांनी मांडले.

पंचायतीकडून कुत्र्यांना पकडून ठेवले जाऊ शकत नाही. पण, त्यांच्यासाठी आवश्यक शेल्टर केलेले आहे. त्यामुळे कुणीही अन्नपदार्थ आणून किनार्‍यावर कुत्र्यांना घालू नये. तसेच कुत्र्यांना किनारी भागात आणून सोडण्याचे प्रकारही बंद होण्याची गरज आहे, असे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले.