दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या चालकास अटक
म्हापसा : तार कोलवाळ येथे भरधाव कारने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मायलेक गंभीर जखमी झाली. अपघातास कारणीभूत कारचालक आकाश लिंगुडकर (२३, रा. माडेल थिवी) याला पोलिसांनी अटक केली. संशयित कारचालक दारुच्या नशेत गाडी चालवत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून आढळून आले आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या झरीना डिसोझा (४३) व लेरिसा डिसोझा (१३) अशी मायलेकीची नावे असून त्या कडशाल नादोडा-बार्देश येथील रहिवासी आहेत. झरीना हिचे दोन्ही हात, तर लेरिसा हिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
अपघात मंगळवारी, १४ रोजी सांयकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी मायलेक या जीए ०३ एएस ८३३० क्रमांकाच्या दुचाकीवरून कोलवाळहून नादोडा येथे घरी जात होत्या. तर विरुद्ध दिशेने रेवोड्याहून जीए ०३ एएफ ३८३० क्रमांकाची बलेनो कार येत होती.
तार, कोलवाळ येथे दुचाकी पोहोचताच भरधाव कारने विरुद्ध दिशेने जात जोरदार धडक दुचाकीला दिली. धडकेमुळे दुचाकीवरील दोघी उसळून रस्त्यावर कोसळल्या व दुचाकी कारच्या दर्शनी भागाखाली अडकली.
जखमींना रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व संशयिताला जमावाच्या तावडीतून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत संशयिताने दारू प्राशन केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.
अपघाताचा पंचनामा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल पिळगावकर व रिकी फर्नांडिस यांनी केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जमावाकडून एकाला चोप, दुसरा निसटला
अपघात घडताच गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघातानंतर कारमधील दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमावाने एकाला पकडून चोप दिला, तर दुसरा निसटण्यास यशस्वी ठरला.