आसिफ सौदागर याला एसआयटीने घेतले ताब्यात
पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी खान याचा भागीदार आसिफ सौदागर (३३, करासवाडा - म्हापसा) याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. या प्रकरणात एसआयटीने मुख्य सूत्रधार सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याच्यासह त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान हिला या पूर्वी अटक केली आहे.
तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेटये यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, थिवी - बार्देश येथील सर्व्हे क्र. ४५५/७, ४६६/५ आणि ४६६/६ मधील जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडप करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी तत्कालीन उपनिरीक्षक आशीष परब यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, सरकारने जमीन हडप प्रकरणात एसआयटी स्थापन केल्यानंतर वरील प्रकरण तिथे वर्ग करण्यात आले. एसआयटीचे उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर यांनी तपास सुरू केला. दरम्यान, या प्रकरणातील संशयित सिद्दिकी खान चार वर्षांपासून फरार होता. त्याला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी एसआयटीने हुबळीमधून अटक केली होती.
सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. त्यासाठी त्याने आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याची मदत घेतली होती. गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान होती. तिचाही जमीन हडप प्रकरणात सहभाग असल्यामुळे एसआयटीने तिला अटक केली होती. न्यायालयाने सिद्दिकी आणि त्याच्या पत्नीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी एसआयटीने तपास सुरू करून संशयित सिद्दिकी याचा साथीदार आसिफ सौदागर याला मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे.
आसिफ पूर्वी होता पोलीस खात्यात
जमीन हडप प्रकरणात अटक केलेला आसिफ सौदागर हा पूर्वी पोलीस खात्यात सेवा बजावत होता. त्यानंतर त्याने पोलीस सेवेतून राजीनामा देऊन रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. याच काळात जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी खान याच्याशी त्याने भागीदारी सुरू केली. वरील प्रकरणात त्याचा सहभाग असल्यामुळे त्याला एसआयटीने अटक केली आहे.