जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखादा सर्वमान्य कार्यक्रम तयार करण्याची गरज होती. पक्षबांधणी करण्याची पद्धत काँग्रेसमध्ये गेली काही वर्षे विस्मरणात गेली आहे. इंडी आघाडीची बैठक आयोजित करण्यात कोणाला स्वारस्य असलेले दिसत नाही.
एखादा नकारात्मक उद्देश ठेवून केलेले काम कधीच यशस्वी होत नसते. याला राजकारणही अपवाद नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदच्युत करणे किंवा भाजपला सत्ताभ्रष्ट करणे एवढाच कार्यक्रम हाती घेऊन एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीला लागलेली घरघर जाणवू लागली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने इंडी आघाडीचा घटक असलेल्या आप पक्षाशी जागावाटप केलेले नाही. त्यापूर्वी पंजाबमध्येही हे दोन पक्ष एकत्र आले नव्हते. दिल्लीची निवडणूक महिन्यावर आलेली असतानाच, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातच थेट लढत होईल, अशी चिन्हे दिसतात. आपने तर भाजप व काँग्रेस पक्षात सामंजस्य झाले असल्याची टीका केली आहे. या स्थितीत इंडी आघाडी कितपत टिकू शकेल, असा प्रश्न निर्माण होतो. या आघाडीचे दोन पक्ष म्हणजे आप आणि काँग्रेस यात बिनसले आहे. देशात अन्यत्रही सर्व विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. काँग्रेस पक्ष पुढाकार घेऊन देशव्यापी नेतृत्व देण्याच्या स्थितीत नाही. काही राज्यांत तर घटक पक्षच एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत, एकमेकांवर टीका करीत आहेत. पश्चिम बंगालचे उदाहरण घेता येईल. तेथे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचे पटत नाही. आता तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीच्या अस्तित्वासंबंधीच प्रश्न उपस्थित केला आहे. ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती होती, तर ती आता विसर्जित केलेली बरी, असे मत व्यक्त करून त्यांनी आघाडीला सुरुंग लावला आहे. नेतेपदाची उणीव, बैठकांचे नियोजन नाही, कार्यक्रम नाही अशा स्थितीत विरोधकांची आघाडी वाटचाल करू शकेल, असे वाटत नाही. कशाला हवी अशी निष्क्रिय आघाडी असा मुलभूत प्रश्न अब्दुल्ला यांनी विचारून धक्काच दिला आहे. मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेले ओमर अब्दुल्ला केंद्रातील सरकारशी जुळवून घेत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. इंडी आघाडीतील पक्षच ही टीका करीत आहेत. एकमेकांवर विश्वास नसलेले पक्ष जनतेमध्ये आपल्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करू शकतील, असे वाटत नाही.
आघाडीचे नेतेपद ममता बॅनर्जींनी स्वीकारावे, अशी मागणी मध्यंतरी झाली होती. त्याबाबतही काहीच हालचाल दिसत नाही. मोठा पक्ष म्हणून काँग्रेस वर्चस्व गाजवू पाहत असला तरी त्या पक्षाजवळ असलेले सक्षम नेते पुढे येत नाहीत किंवा आणले जात नाहीत. गांधी कुटुंबाशिवाय अन्य कोणी नेतृत्व करू शकतो, यावर त्या पक्षातील अनेक नेत्यांचा विश्वास नाही. मल्लिकार्जुन खर्गे किंवा राहुल गांधी यांचे नेतेपद संसदेत प्रभाव टाकू शकलेले नाही. नवे मुद्दे, नवा कार्यक्रम, पक्ष संघटना याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इंडी आघाडीची स्थिती दयनीय झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. सत्ता नसल्यामुळे भ्रमनिराश झालेले नेते कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करू शकत नाहीत. भाजपची वाटचाल ज्या पद्धतीने सुरू आहे, त्याला पर्याय देण्याची क्षमता इंडी आघाडीजवळ राहिलेली नाही, हे सत्य मान्य करावे लागेल.
जनतेसमोर केवळ मोदी हटाव हाच एकमेव मुद्दा ठेवून लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक एकत्र आले. काही अपवाद सोडला, तर बहुतेक राज्यांत त्या पक्षांनी जागावाटपही केले. मतविभागणी टाळण्याचा प्रयत्न यशस्वी होऊन विरोधकांना चांगले यश मिळाले. विशेषतः काँग्रेस पक्षाची स्थिती थोडीफार सुधारली, पण त्या आघाडीला सत्ता द्यावी असे भारतीय मतदारांना वाटले नाही. भाजपच्या पक्ष संघटनेसमोर टिकाव न लागणे हेही प्रमुख कारण होते. याशिवाय जनता दल (यू) आणि तेलगू देसम या पक्षांशी निवडणूकपूर्व युती केल्याचा लाभ एनडीए या भाजपप्रणीत आघाडीला झाला होता. त्यामुळे सत्ताप्राप्तीचे विरोधकांचे स्वप्न भंगले. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ज्या ९९ जागा जिंकल्या, त्याचे महत्त्व वाढले. हा उत्साह आणि उल्हास टिकणे गरजेचे होते. ज्या विरोधी पक्षांना जवळ घेतले, त्यांच्याशी चांगले संबंध कायम ठेवणे गरजेचे होते. जनतेला विश्वास देण्यासाठी एखादा सर्वमान्य कार्यक्रम तयार करण्याची गरज होती. पक्षबांधणी करण्याची पद्धत काँग्रेसमध्ये गेली काही वर्षे विस्मरणात गेली आहे. भाजप युतीतील पक्षांना संपवतो, असा आरोप करणारे विरोधी पक्षनेते आपसात मात्र सहकार्य वाढवू शकले नाहीत. भाजपला टक्कर देणे इंडी आघाडीला शक्य झाले नाही, यामागचे हे एक कारण आहे. याचा परिणाम व्हायचा तो झालाच. हरयाणा अथवा महाराष्ट्रात विरोधी आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. एक समर्थ नेता असणे गरजेचे होते, तेथे नेहमीच पराभव पाहत आलेल्या राहुल गांधी यांच्या अयशस्वी नेतृत्वाला समोर आणणे जनतेला आकर्षित करू शकले नाही. नेता नाही, समन्वय नाही, संघटना बांधणी नाही ही अवस्था इंडी आघाडीला विसर्जनाच्या वाटेवर नेणारी ठरल्यास नवल नाही.