मुलींवरील अत्याचार कमी नाहीच, सुरक्षितता कधी?

Story: अंतरंग |
12th January, 09:37 pm
मुलींवरील अत्याचार कमी नाहीच, सुरक्षितता कधी?

महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षिण गोव्याचा विचार करता, मागील तीन वर्षांतील आकडेवारी पाहता महिलांवरील लैंगिक अत्याचारांची सरासरी ३५ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्काराची प्रकरणे पुढे येत आहेत. प्रकरणांची नोंद होऊन पोलिसांकडून आरोपींना गजाआड केले जात आहे. पण कायद्याचा धाक कमी झाल्याने हे प्रकार थांबलेले नाहीत. सरकारकडून महिला सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देतानाच पालकांनीही मुलींवर लक्ष ठेवावे व मुलींनीही नजीकच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.

दक्षिण गोव्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. २०२२ या वर्षभरात बलात्काराच्या ३४ प्रकरणांची नोंद आहे, तर २०२३ मध्येही कमी न होता ३४ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद असून २०२४ सालीही संख्या वाढून ३९ एवढी झालेली आहे. बलात्कारांच्या या प्रकरणांनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुढे आलेला होता. त्यावेळी संशयितांना गजाआड करण्यात आले, पण त्यानंतरही महिला सुरक्षेला प्राधान्य देत काही बदल होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली होती. गोव्यात घडणार्‍या या घटनांवर पूर्णपणे आळा घालायचा असल्यास गस्तीत वाढ करण्याची, किनारी भागातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून लक्ष ठेवण्याची गरज आहे. किनार्‍यांवर मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. पोलिसांना गस्तीसाठी आवश्यक वाहनांची सोय राज्य सरकारकडून करून देणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचारप्रकरणी शोध घेण्यासाठी दक्षिण गोवा पोलीस क्षेत्रात महिला व मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांचा तपास योग्यरितीने व तत्काळ होण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त पोलीस स्थानकाची निर्मिती होण्याची गरज आहे. पोलीस मुख्यालयात सक्षम महिला अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी. तसेच पीडितेकडून ओळख लपवण्याची मागणी होत असल्यास पोलिसांनी स्वेच्छा दखल घेत लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. लैंगिक अत्याचारप्रकरणी वैद्यकीय तपासणीसाठी अजूनही पीडितांना पणजीला नेण्यात येते. त्यामुळे आवश्यक सुविधा व वैद्यकीय अधिकार्‍यांची उपलब्धता सरकारकडून दक्षिण गोव्यातच करून देणे आवश्यक आहे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगमध्ये वाढ करायला हवे. बलात्कार व मानवी तस्करीची प्रकरणे फास्ट ट्रॅकवर निकालात काढायला हवी. महिला सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष न करता पोलिसांकडून तपास होण्याचीही गरज आहे. प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, अल्पवयीन मुलीला धमकावत बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना तर कामगार म्हणून आलेल्या नराधमांकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांकडून आरोपींना अटक झाली, पण परप्रांतातून येणार्‍या अशा लोकांवर लक्ष ठेवणे व त्यांची योग्य माहिती गोळा करण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर आहे. महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष पथकांची स्थापना करायला हवी. बसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, पोलीस ठाण्यातील महिला अधिकार्‍यांची संख्या वाढवणे, पीडितांना वेळेत वैद्यकीय सेवा व वास्तव्याची सोय व्हावी यासाठी मुबलक निधीची तरतूद व्हावी, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.


-अजय लाड, 

(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ  आहेत.)