भीषण अग्नितांडवात ‘फायरनेडो’चा प्रवेश

Story: विश्वरंग |
12 hours ago
भीषण अग्नितांडवात ‘फायरनेडो’चा प्रवेश

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत अब्जावधींचे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले असून या आगीत २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या आठवड्यात अग्निवादळ व उष्ण वारे वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या आगीत अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगलेही जळून खाक झाले. आगीत आतापर्यंत १२ हजारांहून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. १,५०,००० हून अधिक लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. ही आग १६० किलोमीटर परिसरात वेगाने पसरली आहे. यामुळे १५० बिलियन डॉलर्सपर्यंत नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लॉस एंजेलिसमध्ये या भीषण अग्नितांडवात एक धोकादायक 'फायरनेडो' देखील दिसले. या अग्निवादळाचा हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच रात्री शूट करण्यात आला असून तो व्हायरल झाला आहे.

फायरनाडो हा शब्द आग आणि टोर्नेडो (चक्रीवादळ) यांचे मिश्रण आहे, ज्याचा अर्थ आगीचे चक्रीवादळ असा होतो. आजूबाजूला वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे जेव्हा पोकळी निर्माण होते, तेव्हा ती अत्यंत शक्तिशाली बनते. अशीच क्रिया आगीदरम्यान वायू एकमेकांना धडकल्याने होते. अशावेळी आगीचे एक चक्रीवादळ दिसू लागते. हे चक्रीवादळ एक फूट ते १५ फुटांच्या दरम्यान असू शकते.

अनेकदा शक्तिशाली चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडतात. तसेच वादळात इमारती व घरे जमीनदोस्त होतात. वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे घरे, गाड्याही हवेत उडली जातात. नॅशनल व्हेदर सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, २०१८ नंतरची ही सर्वात भीषण आग आहे. वाऱ्याचा वेग ताशी १४३ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत नुकसान होण्याचे प्रमाण वाढू शकते. काही वेळा वादळामुळे आगीचे गोळे उडून इतरत्र पसरून आग वाढण्याचा धोका जास्त असतो. ही आग रहिवासी भागातही पसरू शकते. १९२३ मध्ये जपानमध्ये भीषण आग लागली होती. त्यापूर्वी झालेल्या भूकंपानंतर ही आग लागली होती. या आगीत १५ मिनिटांत ३८ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

आग विझवण्यासाठी पाण्याचा साठा कमी पडत असल्याने कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गेविन न्यूजॉम यांनी आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, पाण्याचा तुटवडा कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. एलए फायर डिपार्टमेंटच्या प्रमुख क्रिस्टिन क्रॉली यांनी अग्निशमन दलासाठी पुरेशी आर्थिक मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मेयर करेन बास यांनाही प्रशासनाच्या अपयशासाठी टीकेला सामोरे जावे लागत आहे.

- गणेशप्रसाद गोगटे, गोवन वार्ता