क्लस्टर विद्यापीठांची गरज

गोवा विद्यापीठाने आपला एककल्लीपणा सोडून सर्वसमावेशक शिक्षण पद्धती आणि शिस्तीकडे लक्ष दिले नाही तर क्लस्टर विद्यापीठांच्या स्पर्धेत गोवा विद्यापीठ मागे पडू शकते.

Story: संपादकीय |
17th January, 12:19 am
क्लस्टर विद्यापीठांची गरज

गोव्यात एकच विद्यापीठ आहे. जिथे गोव्यातील सर्व महाविद्यालये संलग्न आहेत. सुमारे ३३ व्यावसायिक महाविद्यालये आणि इतर ३५ च्या आसपास महाविद्यालये गोवा विद्यापीठाकडे संलग्न आहेत. सध्या सरकारने सुमारे चार खासगी विद्यापीठांना तत्वतः परवानगी दिल्यामुळे पुढील दोन तीन वर्षांमध्ये पाच ते सहा विद्यापीठे गोव्यात होतील. शिवाय मुक्त विद्यापीठांचा कारभारही गोव्यात सुरू आहे. आता सरकारने एक अभिनव कल्पना मांडली आहे, ज्यामुळे गोव्यात सरकारचीच तीन ते चार विद्यापीठे असतील. उत्तर आणि दक्षिण गोव्यात एक अशा दोन क्लस्टर विद्यापीठांची तूर्तास स्थापना करण्याचा प्रस्ताव तयार आहे. गोव्यात चांगला दर्जा किंवा ए ग्रेड प्राप्त केलेली अनेक महाविद्यालये आहेत, त्यांना या क्लस्टर विद्यापीठांमध्ये सहभागी होता येईल. गेल्या काही वर्षांमध्ये गोवा विद्यापीठाचा दर्जा घसरत चालला आहे. अशा वेळी दर्जात्मक महाविद्यालयांना वेगळ्या विद्यापीठाची संकल्पना निश्चितच पसंत पडेल. त्यासाठी क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव फायद्याचा ठरू शकतो.

क्लस्टर विद्यापीठ ही देशातील तशी नवी संकल्पना. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसोबत क्लस्टर विद्यापीठ संकल्पनाही सध्या राबवली जात आहे. सध्या काही राज्यांमध्ये ही संकल्पना अंमलातही आली आहे. महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तेलंगण, उत्तराखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक अशा काही राज्यांमध्ये या संकल्पनेला गती मिळत आहे. अद्याप क्लस्टर विद्यापीठांची स्थापना मोठ्या प्रमाणात होत नसली तरी देशात त्याची सुरुवात झाली आहे. गोव्यात ही कल्पना सरकारने विचारात घेतल्यामुळे ही क्लस्टर विद्यापीठे स्थापन झाली तर महाविद्यालयांना सरकारच्याच तीनपैकी कुठल्याही एका विद्यापीठाकडे संलग्न होण्याची संधी मिळणार आहे. यातून काही गोष्टी चांगल्या होतील. गोवा विद्यापीठाची स्पर्धा वाढेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी दबावही येईल. सरकारने हा उपक्रम राबवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच इतर राज्यांमध्ये क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना मार्गी लावणाऱ्या काही तज्ज्ञांना बोलावून त्यांची पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न उच्च शिक्षण खाते करणार आहे. म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापर्यंत क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना गोव्यात अस्तित्वात येऊ शकते. 

फर्मागुडी येथे क्लस्टर विद्यापीठ झाले तर फोंडा, डिचोली, पेडणे, बार्देशमधील चांगल्या दर्जाची महाविद्यालये या क्लस्टरमध्ये जाऊ शकतात. दक्षिण गोव्याच्या क्लस्टर विद्यापीठात केपे, काणकोण, सासष्टीतील महाविद्यालये पर्याय स्वीकारू शकतात. ज्या महाविद्यालयांना गोवा विद्यापीठाशी संलग्न रहावे असे वाटते त्यांना तो पर्यायही असेल. त्यामुळे कुठल्या महाविद्यालयावर दबाव नसेल. दोन क्लस्टर आणि गोवा विद्यापीठ अशी तीन विद्यापीठे झाल्यानंतर नवी दोन्ही क्लस्टर विद्यापीठे आपल्या कार्यकक्षेतील महाविद्यालयांचा अभ्यासक्रम स्वतः तयार करू शकतील. म्हणजे तिन्ही विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम वेगवेगळा असेल. क्लस्टर विद्यापीठे गोव्याला केंद्रबिंदू ठेवून चांगला अभ्यासक्रम तयार करू शकतील. शिवाय ही विद्यापीठे त्या त्या तालुक्यांतील महाविद्यालयांना जवळची होतील. विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संशोधनासह इतर अनेक सुविधांच्या वापरासाठी समन्वय वाढण्यास मदत होऊ शकेल. साधन सुविधांची देवाणघेवाण होईल आणि यातून एकाच प्रकारच्या साधन सुविधांच्या निर्मितीची पुनरावृत्ती टळू शकेल. प्रामथिकदृष्ट्या क्लस्टर विद्यापीठांमध्ये व्यावसायिक, इतर महाविद्यालये तसेच संगीत, नाट्य महाविद्यालये एकत्र आली तर विद्यार्थ्यांना आपल्याला हवे ते विषय घेऊन शिक्षण घेण्याची मुभा राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल निर्माण करण्यासह विद्यापीठ कॅम्पसमध्ये नोकर भरतीसाठीचे उपक्रम राबवणे जास्त सोपे होऊ शकते. क्लस्टर विद्यापीठांमुळे अंतर्गत स्पर्धा होईल ज्यातून उच्च शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच वाढू शकते. महाविद्यालयांमध्ये स्पर्धा वाढू लागल्यानंतर शिक्षक आणि व्यवस्थापनांवरही चांगल्या शिक्षण पद्धतीसाठी, सुविधांसाठी आणि शिस्तीसाठी दबाव येईल. अनेक महाविद्यालयांमध्ये आज शिस्तीचा अभाव आहे. कदाचित त्यांच्यावर वचक नसल्यामुळेही तसे होत असेल. क्लस्टर आल्यानंतर महाविद्यालयांमध्ये शिस्त येऊ शकते. ही संकल्पना गोव्यात नवी असली तरी भविष्यात अशा विद्यापीठांची संख्या गोव्यात निश्चित वाढणार आहे. सरकारने त्यासाठीही तयारी ठेवावी लागेल. काही खासगी विद्यापीठांना आधीच सरकारने मंजुरी दिली आहे, त्यामुळे गोव्यात विद्यापीठांचे पीक आले तर आश्चर्य वाटू नये. यात गोवा विद्यापीठाने आता झोपेतून जागे व्हावे लागेल. विद्यापीठाचा घसरत चाललेला दर्जा सावरण्यासाठी नवी विद्यापीठे स्थापन करण्याची संकल्पना हा एक इशारा आहे. गोवा विद्यापीठाने आपला एककल्लीपणा सोडून सर्वसमावेशक शिक्षण पद्धती आणि शिस्तीकडे लक्ष दिले नाही तर क्लस्टर विद्यापीठांच्या स्पर्धेत गोवा विद्यापीठ मागे पडू शकते.