विधानसभेत नियमांचे पालन होत नाही, राष्ट्रगीताचा अवमान होतो, असे कारण सांगून यंदाही राज्यपाल आर. एन. रवी यांनी सभागृहात अभिभाषण न करताच काढता पाय घेतला. अभिभाषणाचे वाचन न करण्याचे राज्यपालांचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. राज्यपालांनी भाषण न देता, विधानसभा सोडणे बालिशपणाचे लक्षण असल्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले. यावर राज्यपालांनीही ‘मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा अहंकार चांगला नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यघटनेच्या अनुच्छेद १७६ नुसार विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण होते. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यावर, तसेच प्रत्येक वर्षी पहिल्या अधिवेशनात हे अभिभाषण होते. मंत्रिमंडळाने तयार केलेले अभिभाषण राज्यपाल वाचून दाखवितात. अभिभाषणात सरकारची त्या वर्षातील धोरणे वा कार्यक्रम यांचा उल्लेख असतो. विधानसभेत पहिल्या दिवशी राज्यपालांचे सभागृहात आगमन होताच ‘तामीळ थाई वझतू’ हे राज्यगीत सादर करण्यात आले. अभिभाषणाच्या वेळी आधी राष्ट्रगीत व्हावे, अशी सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना केली होती; परंतु तामिळनाडूत अधिवेशनाची सुरुवात राज्यगीताने, तर शेवट राष्ट्रगीताने होतो, अशी प्रथा आहे.
यामुळे राज्यपालांची सूचना मान्य करण्यात आली नाही. राष्ट्रगीत न वाजवले गेल्याने निषेध म्हणून राज्यपाल रवी तीन मिनिटांतच सभागृहातून बाहेर पडले. २०२३ आणि २०२४ मध्येही राज्यपालांनी विधानसभेत अभिभाषण वाचले नव्हते.
यानंतर राज्यपाल रवी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, राष्ट्रगीताचा योग्य आदर राखण्याचा आणि संविधानाअंतर्गत मूलभूत कर्तव्ये पार पाडण्याचा स्टॅलिन यांचा दावा मूर्खपणाचा आहे. ते भारताला राष्ट्र मानत नाहीत आणि राज्यघटनेचा आदर करत नाहीत. एवढा अहंकार चांगला नाही. मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, राज्यपाल विधानसभेत येतात; पण सभागृहाला संबोधित न करता परत जातात. त्यांची ही कृती बालिशपणाची आहे. मला वाटते राज्यपाल तामिळनाडूचा विकास पचवू शकत नाहीत.
राजभवन आणि राज्य सरकारमधील वाद सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी राज्यपालांना हटवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी कोणताही प्रश्न प्रतिष्ठेचा न करता सामोपचाराने घेतले पाहिजे. यातच जनतेचे हित आहे.
प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)