कंगाल पाकिस्तान रातोरात होणार मालामाल

Story: विश्वरंग |
10 hours ago
कंगाल पाकिस्तान रातोरात होणार मालामाल

आर्थिकदृष्ट्या कंगालीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सिंधू नदीच्या खोऱ्यात प्रचंड मोठ्या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. या खाणींमध्ये सुमारे ३२.६ मेट्रिक टन सोन्याचे साठे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ पाकिस्तान’ने हे सोन्याचे साठे शोधून काढले आहे. या सोन्याची किंमत सुमारे ६०० अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंजाब प्रांताचे खाण मंत्री सरदार शेर अली गोरचानी यांनी पाकिस्तानात सोन्याच्या खाणीचा शोध लागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या खाणीतून सोने काढण्यासाठी सौदी अरेबियाच्या कंपनीशी करार करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने अटोकमधील सोन्याच्या साठ्यांचा अभ्यास सुरू केला आणि तेथे मोठ्या प्रमाणात सोने सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत ६०० अब्ज रुपये आहे. सरकारने सोन्याच्या साठ्याच्या लिलावासाठी तत्काळ नियम तयार केले असून ही प्रक्रिया एका महिन्यात सुरू होईल, अशी माहिती खनिज मंत्री सरदार गोरचानी यांनी दिली. पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने या संदर्भात अटोकमधील १२७ ठिकाणचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले 

आहेत.

पाकिस्तानच्या उत्तरेकडील डोंगराळ भागातील सोन्याच्या खाणींनी समृद्ध अशा सिंधू नदीच्या पात्रात बेकायदा खाणकाम करण्यास पाक सरकारने बंदी घालली आहे. हिवाळ्यात नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा स्थानिक नागरिक नदीपात्रातून सोन्याचे कण गोळा करत असल्याने सरकारने या भागात उत्खननासंदर्भात कलम १४४ लागू केले आहे. हे सोने हिमालयातून प्रवाहाद्वारे खाली येते आणि पेशावरभोवती जमा होते. कालांतराने सोन्याचे कण सिंधू नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याद्वारे वाहून जात नदीपात्रात जमा होतात. पंजाब प्रांतात अटोक जिल्ह्यात ३२ किलोमीटरच्या परिसरात सोन्याच्या खाणीचे साठे पसरलेले असल्याचे म्हटले जाते.

या खाणींचे योग्य पद्धतीने उत्खनन केल्यास या सोन्याच्या ठेवी पाकिस्तान सरकारला भरीव महसूल मिळवून देऊ शकतात तसेच आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात, असे बोलले जात आहे. याशिवाय सोने काढण्याच्या प्रक्रियेद्वारे पाकिस्तानातील तरुणांसाठी नवीन रोजगार निर्माण होऊन अटोकसारख्या भागात अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. पण, त्यासाठी प्रशासनाने खाण कामे व्यवस्थित नियंत्रित, कायदेशीर आणि शाश्वत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


सुदेश दळवी