बँकेला आयोगाची चपराक

बँका आपल्याला कर्ज घेण्यासाठी दिवसातून अनेक वेळा आपल्याशी खूप गोड बोलून फोन करतात. हप्ते भरण्यात ग्राहकाची जरा जरी चूक झाली की बँक कुठलीही सबब न ऐकता लगेच कारवाई करते. यासाठी कर्जाच्या अटी आणि शर्ती यांचा नीट अभ्यास केला पाहिजे.

Story: विचारचक्र |
16th January, 12:04 am
बँकेला आयोगाची चपराक

कर्ज देताना गोड बोलणाऱ्या, वारंवार ग्राहकाला फोन करून कर्ज घेण्यासाठी गळ घालणाऱ्या बँका एकदा का ग्राहकाने कर्ज घेतले की आपला रंग बदलतात. एखाद्या अडचणीमुळे ग्राहकाचे काही हप्ते चुकले की बँका गुंडांप्रमाणे वर्तन करतात. ग्राहकाच्या स्थितीचा, त्याच्या आर्थिक अडचणींचा कसलाही विचार न करता, अनेकदा ग्राहकाला कसलीही आगाऊ सूचना न देता वसुलीचे काम करतात. याविरोधात दाद मागता येऊ शकते.

एखादा माणूस आपल्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेतो आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतो. कर्जाचे हप्ते फेडतो आणि स्वतःचा उत्कर्ष साधतो. पण कधी कधी माणसावर अशी परिस्थिती येते की काही आर्थिक अडचणीमुळे तो बँकेचे हप्ते भरू शकत नाही. बँकेला मात्र भावनेपेक्षा त्यांचे हप्ते आणि धंदा यात स्वारस्य असते. अशा वेळी बँका व्यावसायिकांवर कडक कारवाई करतात. अशी बरीच उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघतो. असाच एक प्रसंग हरयाणातील एका गरीब ट्रक चालकावर आला.

हरयाणातील शेरसिंग यांनी आपल्या कामासाठी अशोक ले लँड कंपनीकडून मालाची वाहतूक करण्यासाठी एक ट्रक विकत घेतला. त्यासाठी त्यांनी एका बँकेकडून १६.५५ लाखांचे कर्ज घेतले. दोघांमध्ये जो करार झाला त्यानुसार ४५,६०० रकमेच्या समान मासिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करायची असे ठरले होते. पण पुढे कशा घडामोडी होतील, हे सिंह यांना थोडेच ठाऊक असणार? मोठ्या उमेदीने त्यांनी कामाला सुरुवात केली. ट्रक चालवायला सुरुवात केल्यावर त्यांच्या लगेचच लक्षात आले की ट्रकमध्ये बऱ्याच दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. दुरुस्तीचा खर्च न पेलवणारा होता. कामच झाले नाही तर पैसे कसे मिळणार? यातून मोठे आर्थिक नुकसान झाले. अर्थातच हप्ते थकले. त्यामुळे मनात असून सुद्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१२ या महिन्यांचे हप्ते ते भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बँकेकडे थोडी मुदत वाढ मागितली. बँकेने त्यांचे म्हणणे मान्य केले व त्यांना थोडा वेळ दिला. शेरसिंग यांनी तो मान्य केला आणि ते समाधानाने पुढच्या कामाला लागले.

इकडे बँकेने मात्र वेगळाच कारभार केला. शेरसिंग हे माल घेऊन जात असताना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगढ गावाजवळ बँकेच्या एका कर्मचाऱ्याने त्यांचा ट्रक अडवला. सुमारे आठ ते दहा दांडगट माणसांच्या साथीने तो ट्रक ताब्यात घेतला. शेरसिंग यांना कळले की, ती माणसे बँकेने पाठवली होती. आश्चर्य म्हणजे बँकेने त्याच दिवशी तो ट्रक विकण्यासाठी नोटीसही काढली. तेव्हा शेरसिंग यांनी न घाबरता दिवाणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात असे सांगण्यात आले की, बँकेने तो ट्रक आधीच २०१३ सालच्या मार्च महिन्यात विकला आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालयाने या तक्रारीत काही अर्थ नाही, असे सांगून दावा फेटाळला.

शेरसिंग स्वतःच्या नावाला जागले, त्यांनी हार नाही मानली. ते १९ मे २०१५ रोजी नवी दिल्ली जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे गेले आणि त्यांनी बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली. आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि बँकेला १० लाख रुपये दंड आणि कोर्टाच्या दाव्यासाठी आलेला ५० हजार रुपये खर्च शेरसिंग यांना देण्यात यावा, असा निर्णय दिला. पुढे कोर्ट असेही म्हणाले की, शेरसिंग हप्ता भरू शकले नाहीत ही त्यांची चूक होती, तरीही त्यासाठी त्यांना एक नोटीस द्यायला हवी होती, जेणे करून त्यांना पैशाची सोय करायला वेळ मिळाला असता. शेरसिंग हे मूळचे फरीदाबादचे आहेत. बँकेने ट्रक उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथून जप्त केला. म्हणजेच बँकेने दुसऱ्या जिल्ह्यातून ट्रक जप्त केला. असे करत असताना तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला कळवले देखील नाही. शिवाय बँकेच्या या कारवाईची कुठलीही नोंद बँकेकडे नाही. ही त्यांची मोठीच चूक आहे. बँकेने तो जप्त केलेला ट्रक घाईघाईत अतिशय कमी किंमतीत फक्त बारा लाखांना विकला आणि वर उरलेल्या पाच लाखांची सिंग यांच्याकडेच मागणी केली.

बँकेला हा निवडा मान्य न झाल्याने बँकेने राज्य आयोगाकडे अपील केले. राज्य आयोगाने लक्षात आणून दिले की, तक्रार दाखल करताना शेरसिंग यांनी फक्त ५.४ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी मागितले होते, पण जिल्हा आयोगाने दहा लाख रुपये दंडाची किंमत सुनावली. ही किंमत आधी मागणी केलेल्या रकमेपेक्षा दुप्पट असल्याने राज्य आयोगाने दंडाची रक्कम पाच लाख व कोर्टाचा खर्च म्हणून रुपये ५० हजार शेरसिंग यांना बँकेने द्यावे अशी मागणी केली.

हा निकाल बँक आणि शेरसिंग दोघांनाही मान्य नव्हता. म्हणून दोघांनीही राष्ट्रीय आयोगात रिव्हिजन पिटिशन दाखल केली. राष्ट्रीय आयोगाने सगळ्या बाबी लक्षात घेऊन राज्य आयोगाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आणि शेरसिंग यांना योग्य न्याय मिळाला.

बँका आपल्याला कर्ज घेण्यासाठी दिवसातून अनेक वेळा फोन करतात आणि आपल्याशी खूप गोड गोड बोलतात. हप्ते भरण्यात ग्राहकाची जरा जरी चूक झाली की बँक कुठलीही सबब न ऐकता लगेच कारवाई करते. यासाठी कर्जाच्या अटी आणि शर्ती यांचा नीट अभ्यास केला पाहिजे. नाही तर ग्राहकांच्या नशिबी फोनवरून धमकी किंवा अपमानास्पद वाईट बोलणे ऐकून घेणे येते. ग्राहकांनी अशा वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे. जरी एखादा ग्राहक शेरसिंग यांच्यासारखा अर्धशिक्षित असला तरी त्याची बाजू कायद्याला धरून असल्यास, न घाबरता आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागून कायदेशीर पद्धतीने न्याय मिळवायलाच पाहिजे.


वृषाली आठल्ये, (लेखिका मुंबई ग्राहक पंचायतच्या सदस्य आहेत.)