एकसंधपणाकडे जाणार की अजून भांडत राहणार?

साधे चप्पलसुद्धा घालून न जाणाऱ्या त्या पवित्र प्रांगणात काठ्या, मिर्ची पावडर, हॉकी स्टिक्स अशी साधने घेऊन मारामारी करणे हे आपल्या देवीला तरी मान्य असेल का?

Story: विचारचक्र |
10 hours ago
एकसंधपणाकडे जाणार की अजून भांडत राहणार?

क धी एकेकाळी प्रार्थनास्थळ हे समाजाच्या उन्नतीचे मुख्य ठिकाण होते. भजन, कीर्तनाच्या, प्रार्थनेच्या माध्यमातून भक्तिमार्गातून समाज प्रबोधनाकडे जाण्याचे ते ठिकाण होते. गावाचे मोठे कार्यक्रम, लोकसंस्कृतीचे मांड हे प्रार्थनास्थळ होते. गावात वाद-विवाद झाला तर ‘गावमेळो’ घेऊन तो वाद सर्वांसमक्ष सोडविण्याचे ठिकाण होते. आपल्या समस्या आपणच सोडवण्याकडे गावाचा कल होता. आजही अनेक गावात ‘गावमेळो’ घेऊन गावातील अंतर्गत वाद मिटवले जातात. काल्या-जत्रेच्या आधी सगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचे काम यातूनच होते. सामूहिक श्रमदान करून देवळाच्या प्रांगणाचे सगळे काम, स्वच्छता केली जाते. त्याचे नियोजन गावमेळ्यात होते. जर एखाद्या वादाचा परिपाक पोलीस तक्रारीत झालाच तर गाव त्यावर गावमेळो घेत नाही. गावातून बाहेर न गेलेल्या गोष्टीचाच सोक्षमोक्ष गावातल्या गावात लावला जातो. त्यात भावाभावांमधला तंटा असो किंवा मुला-मुलींची लग्ने असो, सगळे समज गैरसमज या मंदिराच्या प्रांगणात सोडवले जातात.

 गावातील लोकांसाठी गावातील देऊळ ही सर्वात पवित्र जागा असते. चुकून कुणी चप्पलसुद्धा घालून कुणी देवळाच्या प्रांगणात जात नाही. दारू पिणे दूरच, कुणी मांसाहार करूनही देवळात जात नाहीत. मोठमोठी नैसर्गिक, कौटुंबिक वा मानवनिर्मित संकटे असोत, ती झेलायला हा देवच आपल्याला बळ देतो, ही श्रद्धा गावातील प्रत्येक भाविकाची असते. झाडापेडात, डोंगरदऱ्यात, पाण्यात हिंडताना संकट समोर दिसलेच तर तिथल्या तिथे चप्पल काढून कुळमायेला हाक मारीत हात जोडणारी आपली जाणती मंडळी. हे बळ देणाऱ्या देवाचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करणे, हा गावातील प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असतो. पण जसजशी माणसे बदलली, त्यांची भक्ती, त्यांची परिस्थिती बदलली, भक्तांकडे पैसा आला तसे देव श्रीमंत होऊ लागले. देणग्या देऊन लोक आपली भक्ती मिरवू लागले. जेवढी मोठी देणगी, तेवढा मोठा भक्त अशी समीकरणे तयार झाली. संस्कृतीचे, कलेचे केंद्र असलेले मंदिर संपत्तीचे केंद्र बनले. चोरी करण्यासारख्या गोष्टींचा संचय झाला तर चोरी होणे, अपरिहार्यपणे आले. तसे मंदिरांमध्ये चोऱ्या होऊ लागल्या. फंडपेट्या फोडण्यात आल्या. कला, संस्कृती, लोकवेद या चोरी होण्यासारख्या गोष्टी नव्हत्या, पण दुर्दैवाने त्या हद्दपार झाल्या. 

आता संपत्ती संचयाबरोबर काही देवळे ही मानापमानाची नवीन केंद्रे म्हणून समोर आली. जाती, पोटजाती, समाज यामध्ये संघर्ष होऊ लागला. ‘आधी पूजा कुणी करायची? पालखीचे भोई कुणी व्हायचे? देवाला अभिषेक कुणी करायचा? देवीची पहिली ओटी कुणी भरायची? देवळात आलेले साहित्य कुणाच्या मालकीचे? देवळाची जागा कुणाच्या मालकीची?’ अशा अनेक प्रश्नांमधून समाजात तेढ निर्माण होऊ लागले. आपण देवामुळे आहोत, हा भाव जाऊन देव आपल्यामुळे आहे, असा समज काहीनीं करून घेतला. त्या देवाला वाचविण्यासाठी भक्त धावून यायला लागले.

 १४ जानेवारीला समस्त लोकांनी मकर संक्रांती साजरी केली. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, असे म्हणत एकमेकांना प्रेम, आपुलकीचा संदेश दिला अन् लगेच दुसऱ्या दिवशी पर्ये येथील श्री भूमिका देवीच्या कालोत्सवात वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला जाऊन त्याने हिंसक वळण घेतले व वार्षिक कालोत्सवाला गालबोट लागले. काल गळाभेट घेतलेले आज हमरीतुमरीवर आले.

 गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांत देवस्थानांचे वाद सुरू आहेत. त्यात बहुतेक वाद हे मानापमानावरून होतात, तर काही वाद मिळकतीवरून होतात. सगळ्या वादाची परिणती ही त्या देवस्थानाला सरकार दरबारातून टाळे ठोकण्यात होते. मग तो कालोत्सव असो की शिमगोत्सव. असा खंड पडून या उत्सवांना मुकलेली गावे आपल्या सत्तरीतच कितीतरी उदाहरणादाखल मिळतील. खुद्द पर्येच्या श्री भूमिका देवीच्या मंदिरानेही ही बंदी अगोदरच्या काळात सोसलेली आहे.

 मंदिर हे देवाचे घर. त्या प्रांगणात सत्य शीव सुंदराकडे जाण्याचा मार्ग आहे, ही श्रद्धा भाविकांची असते म्हणून भाविक तिथे जातात. साधे चप्पलसुद्धा घालून न जाणाऱ्या त्या पवित्र प्रांगणात काठ्या, मिर्ची पावडर, हॉकी स्टिक्स अशी साधने घेऊन मारामारी करणे हे आपल्या देवीला तरी मान्य असेल का? देवाच्या जवळ जाण्याचा हा मार्ग आहे की राक्षसाच्या? असे करून आपण कुणाला खूष करतोय? आपल्यातल्या भक्ताला, स्वाभिमानाला की गर्वाला? माणूस म्हणून तरी ही कृती शोभनीय आहे का?

पर्येत एकूण बारा वाडे. प्रत्यक्षात बाराजणांची श्री देवी भूमिका माता असली तरी समस्त सत्तरीकरांसाठी ती वंदनीय आहे. फक्त सत्तरीसाठीच म्हणणेही गैर आहे, कारण खाली साखळीपासून ते डोंगरमाथ्यावरील कणकुंबीपर्यंत तिचे सांस्कृतिक ऋणानुबंध आहेत. त्यामुळे एक दोन वाड्यांवरील लोकांच्या या कृतीमुळे या पंचक्रोशीतील समस्त भूमिका देवीच्या भक्तांना लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सगळ्या भक्तांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. कायद्याने हस्तक्षेप करून परत सगळे सुरळीत झाले असले तरी हा पुढे हा प्रश्न आहेच. 

सरळ साधेपणाने समोरासमोर बसून हा तिढा सोडवता येऊ शकत नाही का? वाद संवादाची आपली परंपरा आहे. हवे तर मध्यस्थ म्हणून कुणा तिऱ्हाईत जाणत्या किंवा कायदेतज्ज्ञ माणसाला बसवता येऊ शकते. आताच्या परिस्थितीत हा मध्यस्थ सरकार आहे. कुठल्याही जटिल प्रश्नाला सुवर्णमध्य काढणे शक्य आहे. फक्त आपली संवाद करायची तयारी हवी. राणे माजिक पूजा करतात ती आपल्याला करायची आहे, असे गावकर मंडळींना वाटत असेल तर बाराही वाड्यांवरील प्रतिनिधींची बैठक घेणे गरजेचे आहे. त्या बैठकीत फक्त प्रतिनिधींनाच येण्याचा अन् बोलण्याचा हक्क असावा. जास्त गर्दी केली, तावातावाने बोलले म्हणून आपण मोठे भक्त होत नसतो. त्यासाठी सामंजस्याची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली गेली पाहिजे. मुळात आपल्याला वाद वाढवायचा आहे का मिटवायचा आहे, हे अगोदर ठरवणे गरजेचे. बैठकीत ठरवलेल्या गोष्टीला चिकटून राहणे हे अपरिहार्यपणे आले. नाहीतर मामलेदारांच्या कार्यालयात एक अन् मंदिराच्या प्रांगणात एक असे होता कामा नये. ‘पहिला मान कुणाचा’ अन् ‘दुसरा मान कुणाचा.’ या पहिल्या दुसऱ्याच्या लढाईत अजूनही आपण अडकून पडलोय, याचे वैषम्य वाटतेय. जग कुठे पोचलेय अन् आपण काय करीत आहोत? भक्ती करायचीच आहे तर ती डोळसपणे करा. समस्तांना आपले बंधू भगिनी मानणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा स्मृतिदिन आपण तीन दिवसापूर्वी साजरा केला. ते म्हणतात, “अगदी नास्तिक झालात तरी चालेल परंतु अंधश्रद्धा ठेवणारे मूर्ख होऊ नका.” पण आता अशा अंधश्रद्धा बाळगण्यात आपण धन्यता मानू लागलोय. ‘प्रथम पूजा केली तर ती पोचेल, दुसऱ्या क्रमांकाने केली तर पोचणार नाही. देवभक्ती फक्त मान घेण्यात असते, देण्यात नसते. देवापेक्षा त्याची मिळकत महत्वाची. आपणच देवाला वाचवू शकतो,’ या अन् अशा अनेक भ्रामक कल्पना गोंजारणारी फौज तयार होत आहे. त्याची हानी मंदिराबरोबर गावाची होत असते. समाज म्हणून या ताटातुटीतून आपण एकसंधपणाकडे जाणार की अजून भांडत राहणार? क्षणभर थांबून याचा विचार करूया की नको?


नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या 

व साहित्यिक आहेत.)