आजच्या भागात महाकुंभ, अंतराळ, स्टार्टअप्स ते प्रजासत्ताक दिनापर्यंत मोदींनी अनेक विषयांना हात घातला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. या वर्षातील हा पहिला भाग होता आणि या रेडिओ कार्यक्रमाचा एकूण ११८ वा भाग होता. 'मन की बात' कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो, परंतु यावेळी शेवटचा रविवार हा २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आज म्हणजेच १९ जानेवारीलाच या कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले.
आजच्या भागात महाकुंभ, अंतराळ, प्राण प्रतिष्ठापनेपासून ते प्रजासत्ताक दिनापर्यंत मोदींनी अनेक विषयांना हात घातला.
लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची
यावेळीचा 'प्रजासत्ताक दिन' खूप खास आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा हा ७५ वा वर्धापन दिन आहे. या वर्षी संविधानाच्या अंमलबजावणीला ७५वर्षे पूर्ण होत आहेत. 'प्रजासत्ताक दिना'च्या एक दिवस आधी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण या दिवशीच 'भारतीय निवडणूक आयोगा' ची स्थापना झाली. आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाला आणि लोकशाहीतील लोक सहभागाला संविधानात खूप मोठे स्थान दिले आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले.
महाकुंभ मेळा दैवी आणि अलौकिक आहे
महाकुंभ हा एकतेचा उत्सव आहे. कुंभची परंपरा भारताला एकत्र सांधते. येथे कोणताही भेदभाव नाही. सर्वजण एकत्र बसून जेवतात. हर हर गंगे म्हणत संगमाच्या वाळूवर संपूर्ण भारतातून आणि संपूर्ण जगातून लोक जमतात. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कुठेही भेदभाव किंवा जातिवाद नाही. 'कुंभ', 'पुष्करम' आणि 'गंगा सागर मेळा' - आपले हे सण म्हणजे आपला सामाजिक संवाद, सौहार्द आणि एकात्मता वाढवणारे सण आहेत. असे ते कुंभमेळ्याबाबत म्हणाले.
अवकाश क्षेत्रातील प्रगतीविषयी गौरवोद्गार
२०२५ च्या सुरुवातीलाच भारताने अंतराळ क्षेत्रात अनेक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की, बेंगळुरूस्थित पिक्सेल या भारतीय स्पेसटेक स्टार्टअपने भारतातील पहिले खाजगी उपग्रह – फायरफ्लाय यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. हे यश आपल्या खाजगी अवकाश क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचे आणि नाविन्यपूर्णतेचे प्रतीक आहे. या यशाबद्दल मी संपूर्ण देशाच्या वतीने पिक्सेल टीम, इस्रो आणि इन-स्पेसचे अभिनंदन करतो. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
टियर-२आणि टियर-३ शहरांतील स्टार्टअप्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे
काही दिवसांपूर्वीच स्टार्टअप इंडियाला 9 वर्षे पूर्ण झाली. आपल्या देशात 9 वर्षांत निर्माण झालेल्या स्टार्टअपची संख्या. त्यातील निम्म्याहून अधिक टियर २ आणि टियर ३ शहरांतील आहेत. जेव्हा प्रत्येक भारतीय हे ऐकतो तेव्हा त्याचे हृदय आनंदी होते. याचा अर्थ असा की आपली स्टार्टअप संस्कृती ही केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही असेही ते सरते शेवटी म्हणाले.