वांद्रे पोलीस स्थानकात चौकशी सुरू
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी शुक्रवारी पकडले. शुक्रवारी सकाळी संशयिताला बांद्रा पोलीस स्थानकात आणण्यात आले, तेथे त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर संशयित वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ फिरताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयिताने सैफ अली खानवर हल्ला केला की नाही हे सध्या पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.
गुरुवारी मध्यरात्री एका चोराने सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला केला. या घटनेनंतर संशयिताने सहाव्या मजल्यावरून पळ काढला. यावेळी संशयिताचा चेहरा येथील सिसिटीव्हीमध्ये कैद झाला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलांची आया आलियामा फिलिप यांनी पोलिसात साक्ष दिली आहे. चोराने दाम्पत्याचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीत बाथरूममधून प्रवेश केल्याचा खुलासा त्यांनी आपल्या जबानीत केला आहे. तो एक कोटी रुपयांची खंडणी मागत होता. आलियामाचा आवाज ऐकून सैफ खोलीत गेला आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना हल्लेखोराने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला.
हल्लेखोराने सैफवर ६ वेळा हल्ला केला होता. रात्री साडेतीनच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला हात, घसा, पाठ आणि मानेवर ६ जखमा झाल्या होत्या, त्यापैकी दोन जखमा खूप खोल स्वरूपाच्या होत्या. शस्त्रक्रियेदरम्यान सैफच्या पाठीच्या कण्यानजीक रूतलेला चाकूचा २.५ इंचाचा तुकडा काढण्यात आला आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. काल त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.