पाकिस्तान : अल कादिर ट्रस्ट प्रकरण : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षांचा कारावास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th January, 02:14 pm
पाकिस्तान : अल कादिर ट्रस्ट प्रकरण : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षांचा कारावास

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष न्यायालयाने शुक्रवारी १७ जानेवारी दोघांनाही अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालयाने इम्रान खानला १४ वर्षांची तर त्याची पत्नी बुशरा बीबीला ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी हा निर्णय दिला. न्यायालयाने दोघांनाही आर्थिक दंड ठोठावला आहे. बुशरा बीबीला निकालानंतर लगेचच कडक सुरक्षा व्यवस्थेत अटक करण्यात आली.

काय आहे अल-कादिर ट्रस्ट प्रकरण?

हे प्रकरण भ्रष्टाचार आणि  मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे. इम्रान खान आणि बुशरा बीबी यांनी बहरिया टाऊन लिमिटेडकडून कोट्यवधी रुपये आणि शेकडो कनाल जमीन घेतल्याचा आरोप आहे. २०२३ मध्ये, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) ने या प्रकरणी इम्रान आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या निर्णयाच्या वेळी बुशरा बीबी अदियाला तुरुंगात हजर होती. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच तिला औपचारिकपणे अटक करण्यात आली. तर माजी पंतप्रधान इम्रान खान आधीच तुरुंगात होते. 

खटल्यादरम्यान साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे एकूणच निकालाचे चित्र पालटले. माजी मंत्री परवेझ खट्टक आणि इम्रान यांचे प्रधान सचिव आझम खान यांच्या साक्षीने न्यायालयाचे लक्ष वेधले. आझम यांनी २०१९ च्या बैठकीचा हवाला दिला.  या बैठकीत इम्रान यांच्या स्वाक्षरी असलेली अनेक गुप्त कागदपत्रे सादर करण्यात आली. हे प्रकरण केवळ जमीन हस्तांतरणाशी संबंधित नाही. याच्या खोलात गेल्यास अनेक मोठे मासे गळाला लागतील असे यावेळी साक्षीदारांनी सांगितले. 

 एनएबीनुसार, इम्रान खानने राज्यांना वाटप करण्यासाठी निर्धारित रक्कम बहरिया टाऊनच्या खात्यात हस्तांतरित केली. यात इम्रानसोबतच पाकिस्तानचा प्रॉपर्टी टायकून मलिक रियाझ हुसैन आणि त्याच्या मुलांचीही नावे आहेत. इम्रान आणि त्यांच्या सरकारने राज्याच्या तिजोरीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. £१९० दशलक्ष म्हणजे अंदाजे ७१.२५ अब्ज रुपयांच्या निधीतून अल-कादिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष आणि काही विरोधी पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हे प्रकरण केवळ भ्रष्टाचाराचे प्रकरण नसून पाकिस्तानातील राजकीय ध्रुवीकरणाचे प्रतीक बनले आहे. 

हेही वाचा