यल्लापूर हादरले : विवाहितेचा गळा चिरून खून, फरार संशयिताचीही जंगलात आत्महत्या

घटने मागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे केली गतिमान..

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th January, 03:57 pm
यल्लापूर हादरले : विवाहितेचा गळा चिरून खून, फरार संशयिताचीही जंगलात आत्महत्या

जोयडा : यल्लापूर शहरात शनिवारी दुपारी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली असून, या प्रकरणातील मुख्य संशयितानेही रविवारी सकाळी जंगलात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दुहेरी घटनेमुळे शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यल्लापूरमधील काळम्मानगर परिसरात राहणाऱ्या रंजिता मल्लप्पा बन्सोडे या विवाहित महिलेवर शनिवारी दुपारी अचानक हल्ला झाला. आरोपी रफिक काजलवाड याने धारदार कोयत्याने रंजिता यांच्या मानेवर घाव घातला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रंजिता यांना तातडीने यल्लापूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या भीषण कृत्यानंतर आरोपी रफिक घटनास्थळावरून पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच यल्लापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. रात्रभर शोधमोहीम राबविल्यानंतर, रविवारी पहाटे  जंगल परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत रफिकचा मृतदेह आढळून आला. हत्येनंतर अटकेच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या घटनेचे पडसाद शहरात उमटले असून हिंदू संघटनांनी या निर्घृण खुनाचा तीव्र निषेध केला आहे. पीडित महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी संघटनांनी शहरात आंदोलन केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. एका बाजूला महिलेची अमानुष हत्या आणि दुसरीकडे खुन्याची आत्महत्या, या घटनांमुळे यल्लापूर तालुक्यात सध्या माजली असून पोलीस या प्रकरणामागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा