गावाच्या भल्यासाठी पाटील-कुलकर्णी वाद नको, युती हवी

मराठी साहित्या संमेलनात विश्वास पाटलांची भूमिका

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27 mins ago
गावाच्या भल्यासाठी पाटील-कुलकर्णी वाद नको, युती हवी

सातारा : बिघडलेले गाव जर सुधारायचे असेल आणि गावगाडा सुरळीत चालवायचा असेल, तर ‘पाटील’ आणि ‘कुलकर्णी’ यांनी एकत्र यायलाच हवे. ही युती काळाची गरज आहे, असे मार्मिक विधान ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले. साताऱ्यात सुरू असलेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करत साताऱ्याचा ऐतिहासिक वारसाही उलगडला.

हा पाटील ‘शब्दांच्या फडातला’

आपल्या अध्यक्षीय भाषणात विश्वास पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, सामान्यतः ‘पाटील’ म्हटले की डोळ्यासमोर तीनच गोष्टी येतात. कुस्तीचा आखाडा, तमाशाचा फड किंवा उसाचा मळा. मात्र, हा पाटील ‘शब्दांच्या फडातला’ आहे. विशेष म्हणजे जोशी-कुलकर्ण्यांनीच आग्रह धरला की, यावर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एका पाटलाला मिळावे. एका शेतकऱ्याच्या मुलाचा या सर्वोच्च पदावर सन्मान होणे, ही अतिशय मोठी गोष्ट आहे.

तुमची आचारसंहिता, आमची विचारसंहिता!

सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आणि आचारसंहितेचा संदर्भ देत त्यांनी राजकारण्यांना आणि व्यवस्थेला चिमटा काढला. तुमची राजकीय आचारसंहिता ही जेमतेम दोन-तीन आठवडे टिकते. पण साहित्यिकांची आणि लेखकांची ‘विचारसंहिता’ ही शाश्वत असते. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विचार पोहोचवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे काम करत असते, अशा शब्दांत त्यांनी साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले.

शेतकरी आत्महत्या आणि ‘भारतरत्न’ची मागणी

यावेळी पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरही त्यांनी बोट ठेवले. शेतकरी आत्महत्या करत असेल, तर हे केवळ सरकारचे अपयश नाही, तर ती संपूर्ण समाजाची हार आहे, असे मत त्यांनी मांडले.

सावरकरांच्या आठवणी आणि ऐतिहासिक दाखले

आपल्या भाषणात पाटील यांनी अनेक ऐतिहासिक दाखले दिले. ८७ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ असे म्हटले होते, पण त्याचवेळी त्यांनी मातृभाषेतील शिक्षणाचाही आग्रह धरला होता, याची आठवण पाटलांनी करून दिली. तसेच, पंडित नेहरू पंतप्रधान असताना मजरूह सुलतानपुरी यांनी माफी मागण्यास नकार दिल्याच्या किस्स्याचाही त्यांनी उल्लेख केला.

#SahityaSammelan #VishwasPatil #Satara #MarathiLiterature #AnnabhauSathe
हेही वाचा