लोक म्हणाले, 'इतकी क्लियरीटी आमच्याकडे असती तर आयुष्यात आम्ही देखील नक्कीच काहीतरी केले असते..'
प्रयागराज : तीर्थराज प्रयागराजमध्ये सोमवार पौष पौर्णिमेपासून 'पूर्ण महाकुंभ २०२५'चा प्रारंभ झाला आहे. महाकुंभाच्या या मेळाव्यात लोक सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून त्रिवेणी संगमात (गंगा, यमुना आणि सरस्वती) श्रद्धेने स्नान करत आहेत. स्नानासोबतच 'हर हर महादेव' आणि 'हर हर गंगे'चा जयघोष सर्वत्र गुंजत आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. साधू संतांच्या गोतावळ्यात राहून अध्यात्माच्या दोन गोष्टी कानावर पडाव्यात यासाठी अनेकजण प्रयागराजची वाट धरत आहेत. येथील अनेक संत-महंत आणि साधूंच्या उपस्थितीत प्रयागराजला अनोखे स्वरूप प्राप्त झाले आहे.
याच गोतावळ्यात एक विलक्षण व्यक्तिमत्व आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ते सोप्प्या पण तितक्याच गंभीर स्वरूपात अगदी हसत खेळत देत आहे. ही आसामी आयआयटी बॉम्बेची पदवीधर असून त्याने एरोस्पेस इंजिनयरिंगमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. पण, असे काय झाले की ऐश्वर्यसंपन्न आयुष्याचा त्याग करत याला भगवी वस्त्रे धारण करावी लागली ? चला जाणून घेऊयात पूर्वाश्रमीच्या अभय सिंह आणि आता 'आयआयटी बाबा' म्हणून नावारूपास आलेल्या या अवलियाची गोष्ट.
आयआयटी बाबांचे नाव अभय सिंह असून ते हरियाणाच्या झज्जरमधील सासरौली गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनयरिंगमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. त्यांनी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे लाखों रुपयांचे पॅकेज मिळवत कॅनडात नोकरी देखील केली. पण भ्रमनिरास झाल्याने ते पुन्हा भारतात परतले. पण सद्यघडीस त्यांनी अध्यात्माची कास धरली आहे. त्यांचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. 'काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी विज्ञानाकडे वळलो होतो, पण विज्ञाचाचा अवाका संकुचित आहे, त्यामुळे मी अध्यात्माची वाट धरली. येथे मला माझ्या प्रश्नांची उत्तरे उत्तम प्रकारे मिळतात' असे ते एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना हसत म्हणाले होते.
'लहानपणापासून माझे आई आणि बाबा यांच्या नात्यातील दुरावा मी अनुभवला आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती नेहमीच वेगळी भावना मनात होती. मी चांगले शिकावे, चांगली नोकरी करावी आणि सेटल व्हावे इतकीच त्यांची माफक अपेक्षा होती. ती मी पूर्ण केली. पण मला जे हवे होते मला कधीच नाही मिळाले. प्रयोगशाळेत काम करताना देखील अनेक प्रश्न पिंगा घालायचे. त्याच प्रश्नांनी हैराण झालो होतो. म्हणून एक दिवस सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवली आणि येथे आलो. येथे शांत वाटते.' त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी पुन्हा मिश्किलपणे हसत उत्तर दिले.
दरम्यान हा विडिओ व्हायरल झाल्यानंतर अभयच्या वडिलांची प्रतिक्रिया देखील आता समोर आली आहे. ते आणि अभयची आई त्याच्या या निर्णयावर खुश नाहीत. पण त्यांनी हे देखील सांगून टाकले की अभयने जो निर्णय घेतला आहे, तो विचारपूर्वकच घेतला असेल. त्यात दखल देणार नाही. अभयशी संपर्क करण्याच्या प्रयत्न केला का ? असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारले असता यावेळी ते भावुक झाले. 'अभय खूप हळवा आहे. काही घडले की तो नेहमीच अंतर्मुख होऊन बसायचा. काही बोलणे नाही, कुणाशी संग नाही. आमची कोणती गोष्ट त्याला खुपली असेल हेही कळण्यास मार्ग नाही' असे त्याची आई म्हणाली. गेले सहा महीने त्याच्याशी बोलणे झाले नाही. मेसेजदेखील केला नाही. त्याच्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्याने सर्वांना ब्लॉक केल्याचे आढळून आले असेही त्याचे वडील म्हणाले.
अभयचे वडील करण सिंह हे पेशाने वकील आहेत. आपल्या मुलाने अध्यात्माची कास धरल्याचे त्यांना व्हायरल व्हिडिओतून समझले. अभयला लग्नाची भीती वाटत होती. यामुळेच त्याने ही वाट धरली असावी असे ते म्हणाले. अभय आत्मकेंद्री आहे. स्वतःपुरता विचार करतो. आयुष्यात काय करायचे आहे याबद्दल त्याने कधीच कुणाला सांगितले नाही. आमच्यासोबत बसून दोन गोष्टी कधी बोलल्या असतील हेही आमच्या लक्षात नाही, असे त्याचे वडील म्हणाले. आयआयटीत असताना त्याने उज्जैनमध्ये आयोजित केलेल्या कुंभला भेट दिली होती. आता प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील तर अभयने घरी परतावे असे त्याची आई म्हणाली.
अभयबद्दल वडील सांगतात की, तो लहानपणापासूनच शिक्षणात खूप पुढे होता. त्याच्या चांगल्या रँकमुळे त्याला आयआयटीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि नंतर तो कोरोना महामारीच्या काळात कॅनडालाही गेला, येथे तो आपल्या बहिणीकडे राहत होता. कॅनडाहून परतल्यावर त्यांनीच अभयला कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी निसर्गोपचार क्लिनिकमध्ये घेऊन गेले. येथे ध्यानादरम्यान डॉक्टरांनी त्याला अध्यात्माविषयी सांगितले. कदाचित तेव्हाच अभयने अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा चंग बांधला असावा असे ते म्हणाले.
दरम्यान अन्य एका पत्रकाराने कुंभमध्ये आयआयटी बाबांना त्यांच्या रिलेशनशिपबद्दल विचारले. यावेळी ते पुन्हा मिश्किल हसले. ' मी जवळपास ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. प्रेम आणि इतर गोष्टी ठीक आहेत. पण, एका टप्प्यानंतर एकमेकांचा उबग यायला लागतो. कुणामध्ये गुंतून पडणे हे कधी जमलेच नाही. त्यामुळे सगळेच काही संपले किंबहुना मीच संपवले. पुढे काय करायचे हा प्रश्न नेहमीच पडायचा.' असे आपल्याच तंद्रीत गुंग, त्यांनी पत्रकाराला उत्तर दिले. एकवेळ पत्रकार देखील हे ऐकून स्तब्ध झाला होता.
एकूणच सोशल मिडियावर या पोस्ट खाली हजारो कमेंट आणि लाखों लाईक्सचा भडिमार झाला आहे. @kabira_fakiraa ने ट्विट करत 'इतकी क्लियरीटी आमच्याकडे असती तर आयुष्यात आम्ही देखील नक्कीच काहीतरी केले असते..' अशी खंत व्यक्त केली. @rosa_nino ने ट्विट करत '.. एका टप्प्यानंतर एकमेकांचा उबग यायला लागतो..! वाह.. इतकेही रिलेटेबल व्हायची काहीच गरज नव्हती बाबा !' असे म्हटले आहे. तर @bhowbhow_mick ने ' जनरेशनल ट्रॉमापासून मिलेनियल्सना कोणी वाचवू शकेल तर तो हाच माणूस असेल' असे म्हटले आहे. @raghurokda ने ट्विट करत 'काय माहीत कोणत्या मानसिक तणावात असेल हा माणूस, जे त्याने सगळे काही सोडले. आय होप त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे म्हटले आहे. एकूणच सोशल मिडियावर कुंभमेळ्यासह आयआयटी बाबाची क्रेझ देखील तयार झाली आहे,