कला अकादमीच्या घटनेतील ‘नियम १६’चा भंग; दर्जेदार असूनही पडले बाहेर
पणजी : कला अकादमीच्या ‘अ’ गट मराठी नाट्य स्पर्धेत मंगेशी येथील मांगिरीष यूथ क्लबच्या एका चुकीमुळे स्पर्धेचा निकाल बदलला. या क्लबकडून एक चूक झाली नसती, तर कदाचित स्पर्धेचा निकाल बदलला नसता. यंदा कला अकादमीच्या ‘अ’ गट मराठी नाट्य स्पर्धेत एकूण १८ नाटके सादर झाली. त्यात मांगिरीष यूथ क्लबच्या अल्बर कामू यांच्या ‘द स्ट्रेन्जर’ या लघु कादंबरीवर आधारित ‘तिऱ्हाईत’ या नाटकाचा समावेश होता. या नाटकाचे दिग्दर्शन दक्षा शिरोडकर यांनी, तर नाट्य रुपांतर अंतरा भिडे यांनी केले होते. संपूर्ण स्पर्धेत या नाटकाची हवा होती. प्रेक्षकांनी नाटकाचे तोंडभरून कौतुकही केले होते. त्यामुळे या नाटकाला पारितोषिक मिळणार, याची अनेकांना खात्री होती. परंतु, मांगिरीष यूथ क्लबने एका नियमाचा भंग केल्यामुळे त्यांचे नाटक निकालातूनच बाहेर काढण्यात आले.
कला अकादमीतर्फे दरवर्षी ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटांमध्ये मराठी नाट्य स्पर्धा घेण्यात येते. अकादमीच्या घटनेतील नियम क्रमांक १६ नुसार, ‘ब’ गट नाट्य स्पर्धेतील नाटकात काम केलेल्या कोणत्याही कलाकाराला, तंत्रज्ञाला ‘अ’ गटातील कोणत्याही नाटकामध्ये काम करता येत नाही. तसे झाल्यास ते नाटक स्पर्धेतून बाद ठरवण्यात येते. याच नियमाचा फटका मांगिरीष यूथ क्लबला बसला.
या नाटकातील एका कलाकाराने याआधी ‘ब’ गट नाट्य स्पर्धेतील एका नाटकात भूमिका साकारली होती. त्याच कलाकाराने ‘तिऱ्हाईत’मध्ये भूमिका वठवल्याची माहिती मिळताच एका व्यक्तीने कला अकादमीकडे अर्ज करीत, या प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली. संबंधित व्यक्तीच्या अर्जानुसार कला अकादमीने चौकशी केल्यानंतर ही गोष्ट खरी असल्याचे समजताच, मांगिरीष यूथ क्लबनेही आपल्याकडून नियमाचा भंग झाल्याचे मान्य करीत कला अकादमीला माफिनामा सादर केला. त्यामुळे त्यांचे नाटक निकालातून बाहेर ठेवून कला अकादमीने स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे म्हणतात...
- कला अकादमीच्या ‘अ’ गटाची स्पर्धा नियमानुसारच चालते. घटनेनुसार नियमाचा भंग झाल्यास कारवाई करावीच लागते.
- मांगिरीष यूथ क्लबचे ‘तिऱ्हाईत’ नाटक दर्जेदार होते. गेल्या ५२ वर्षांपासून ही संस्था स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नियमाचे पालन गरजेचे होते. इतक्या वर्षांचा अनुभव असताना या संस्थेने नियमाचा भंग कसा काय केला, असा प्रश्न मलाही पडला. मलाही वाईट वाटले. परंतु, कारवाईशिवाय इतर कोणताही पर्याय आपल्याकडे नव्हता.
- ‘अ’ गट मराठी नाट्य स्पर्धेत अशाप्रकारे नियम भंग होण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी तियात्र स्पर्धेतही दोन तियात्रांकडून अशाप्रकारे घटनेतील नियमाचा भंग झालेला होता. त्याची तत्काळ दखल घेऊन आपण त्या दोन्ही तियात्रांना स्पर्धेतून बाहेर काढलेले होते. त्यातील एका तियात्राला पारितोषिक मिळालेले होते. तेही त्यांच्याकडून परत घेण्यात आले होते.
नाट्य लेखक, दिग्दर्शक अविनाश च्यारी यांचे मत
१. याआधी ‘अ’ गटात नाटक सादर करायचे झाल्यास ‘ब’ गटात ६० टक्के गुण मिळवावे लागत होते. त्यावेळी या दोन्ही गटांतील नाटके अंतिम स्पर्धेसाठी जायची. ‘अ’ गटातील नाटकांना नागरी आणि ‘ब’ गटातील नाटकांना अनागरी स्पर्धेत संधी मिळायची.
२. एखाद्या कलाकाराने दोन्हीही गटातील नाटकांत काम केले, तीच नाटके अंतिम स्पर्धेत पोहोचली आणि ती एकाच दिवशी सादर झाली तर संबंधित कलाकाराची धांदल उडणार, हे लक्षात घेऊन कला अकादमीच्या घटनेत नियम १६ तयार करण्यात आला. या नियमानुसार ‘ब’ गटातील नाटकात काम केलेल्या कलाकार, तंत्रज्ञाला ‘अ’ गटात काम करता येत नाही.
३. कालांतराने ‘अ’ गट सर्वांसाठी खुला करण्यात आला. शिवाय महाराष्ट्राने अनागरी स्पर्धा बंद केल्याने गोव्यातील ‘ब’ गटातील नाटके अनागरी स्पर्धेसाठी जाणे बंद झाले. त्यामुळे एखाद्या कलाकाराने दोन्हीही गटांतील नाटकांत काम केले आणि त्याचे नाटक प्रथमस्थानी आले. तर, ‘अ’ गटातील नाटके अंतिम स्पर्धेसाठी जात असल्याने त्यात बाधा येणार नाही. त्यामुळे नियम १६ ला आता तसे महत्त्व उरलेले नाही.
‘अ’ गट नाट्य स्पर्धेत मांगिरीष यूथ क्लबने नियमाचा भंग करून चूक केली हे मान्य आहे आणि संस्थेनेही कला अकादमीला माफिनामा सादर केलेला आहे. परंतु, स्पर्धेत सहभागी इतर नाटकांकडूनही कला अकादमीच्या अधिकाऱ्यांसमोर अशाप्रकारच्या चुका झालेल्या आहेत. तरीही त्यांना वेगळा आणि आम्हाला वेगळा न्याय मिळाला, याचे वाईट वाटते.
- वासुदेव ढवळीकर, कलाकार