पणजी : ज्यावेळी आम्ही राज्यात भाजपचे काम सुरू केले, त्यावेळी आम्हाला अनेक अहवेलना सहन कराव्या लागल्या. पण, पक्षाला यश मिळत गेले तसे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी आम्हाला काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून आमदार होण्याच्या आणि त्यानंतर मंत्रिपद देण्याच्या अनेकदा ऑफर दिल्या. परंतु, त्या नाकारून आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्याची फळे आज आम्हाला मिळत असल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी स्पष्ट केले.
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. राज्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करीत असताना काहीवेळा आम्हाला संघर्ष करावा लागला. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांकडून अहवेलना सहन कराव्या लागल्या. परंतु, आम्ही कधीही डगमगलो नाही. शांत चित्ताने पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत राहिलो. हळूहळू राज्यात भाजपला यश मिळत गेले. त्यावेळी सध्याच्या भाजप सरकारातील मंत्री सुभाष शिरोडकर काँग्रेसमध्ये होते. त्यांच्यामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी मला काँग्रेसच्या तिकिटावर मडकई मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. आमदार झाल्यानंतर मंत्रिपद देण्याचीही ऑफर त्यांनी दिलेली होती. परंतु, आपण त्यांची ऑफर फेटाळली. प्रामाणिकपणे पक्षाचे काम करीत राहिलो. संघटन ही पक्षाची ताकद असते हे लक्षात घेऊनच आम्ही त्यावेळी काम केले. त्याचा फायदा प्रदेश भाजपला मिळत गेला, असे नाईक म्हणाले.
समाजकारणासाठी राजकारण हे आमचे तत्त्व आहे. आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करीत आलेलो आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आजही नि:स्वार्थीपणे काम करतो. त्यामुळेच कार्यकर्त्यांना पक्षात मोठमोठ्या संधी मिळत जातात. दामू नाईक हे त्यापैकीच एक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आज त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.