पणजी : राजधानी पणजीत स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. यामुळे शहरातील पाच रस्ते १८ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार आहेत. तर एक रस्ता १८ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत बंद असणार आहे. भाटले ते चार पिलार हा रस्ता आधीच बंद करण्यात आला आहे. सध्या शहरात लोकोत्सव सुरू असून अशातच रस्ते बंद करण्यात आल्याने पणजीत पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी रस्त्यावरील डॉन बॉस्को ते युको बँक पर्यंत ३५४ मीटर लांबीचा टप्पा बंद करण्यात आला आहे. डॉन बॉस्को किंवा पणजी बाजारात जाण्यासाठी युको बँकेकडून पी शिरगावकर रस्ता - आत्माराम बोरकर रस्ता - शिक्षण खात्याची जुनी इमारत असा मार्ग घ्यावा लागणार आहे. लिबर्टी शोरुम ते विनंती रेस्टॉरंट हा रस्ता अंशतः हा बंद राहणार आहे. या टप्प्यातून वाहनांना ये जा करता येणार आहे.
टी बी कुन्हा रस्त्यावरील कॅफे भोसले ते दयानंद बांदोडकर मार्ग जंक्शन पर्यंत २३० मीटरच्या टप्पात ड्रेन वाहिनी घालण्यासह इतर कामे होणार आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद राहील. कॅफे भोसलेकडे जाणाऱ्या वाहनांना मिनेझिज ब्रागांझा रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. १८ जून रस्त्यावरील एनजीपीडीए ते काकुलो आयलंड दरम्यानचा १४० मीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे. या ऐवजी वाहन चालकांना पर्यायी समांतर रस्त्याचा वापर करावा लागेल.
यासह कुन्हा रिव्हेरा रस्त्यावरील विनंती रेस्टॉरंट ते दयानंद बांदोडकर रस्ता जंक्शन हा ४० मीटरचा रस्ता बंद असणार आहे. येथून दयानंद बांदोडकर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी हॉटेल मांडवी - स्वामी विवेकानंद रस्ता या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन स्मार्ट सिटीने केले आहे. वरील सर्व मार्ग १८ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. तर ताड माड मंदिर ते एसटीपी पुला पर्यंतचा रस्ता १८ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत बंद असणार आहे.
२ फेब्रुवारी पर्यंत मुख्य काम पूर्ण
वरील रस्त्यांची सर्व मुख्य कामे २ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होतील. यामध्ये भूमिगत सेवा वाहिन्या घालणे, ड्रेन घालणे या कामांचा समावेश आहे. २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान वीज खांब उभारणे, रंगकाम , वृक्षा रोपण अशी कामे करण्यात येतील.