शिक्षण : तांत्रिक शिक्षणातही गोव्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल : मुख्यमंत्री

कोडिंग, रोबोटिक्स शिक्षणात गोवा बंगळूरू, पुणे या शहरांपेक्षा एक पाऊल पुढे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th January, 04:23 pm
शिक्षण : तांत्रिक शिक्षणातही गोव्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल : मुख्यमंत्री

पणजी : राज्यात असलेल्या ४४२ विद्यालयामधील ६५ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोडिंग आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेतलेले आहे. या २०२४ - २५ वर्षात १० हजार विद्यार्थी कोडिंग आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेत आहे. कोडिंग आणि रोबोटिक्स शिक्षणात गोवा बंगळूरू, पुणे या सारख्या मोठ्या शहरांपेक्षाही पुढे असून तांत्रिक शिक्षणातही गोव्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू असल्याचे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी म्हटले आहे.



केअर्स योजने अंतर्गत उपकरणे तथा साधनसुविधांचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, तांत्रिक शिक्षण संचालक विवेक कामत, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोडिंग व रोबोटिक्स प्रमाणे उच्च शिक्षणातही नोकऱ्या मिळण्यास पूरक ठरेल असे  तांत्रिक अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. अधिकाधिक विद्यार्थी कोडिंग व रोबोटिक्सचे शिक्षण घेत आहेत. यामुळे येत्या दोन वर्षात अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकही जागा खाली उरणार नाही, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.




केअर्स  योजनेअंतर्गत कोडिंग, रोबोटिक्सचे हँडबूक, हार्डवेर किटचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. केअर्स क्रिएटीव्ह कंटेट क्रिएटर पुरस्कार अमोल नाईक (मुरगाव हायस्कूल, सडा) आणि आदित्य नाईक (शांतादुर्गा हायस्कूल डिचोली) यांना प्रदान करण्यात आला. बेब्रास इंडिया चॅलेंज स्पर्धेत गोव्यातील विद्यार्थ्यांनी पहिले चार क्रमांक पटकावले. तसेच पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये गोव्याच्या २२ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने गोव्याची वाटचाल सुरू आहे. कोडिंग आणि रोबोटिक्स अभ्यासक्रम हा याचाच एक भाग आहे. दुध, भाजी, मासळी या जीवनावशय्क वस्तूंमध्येच नव्हे तर तांत्रिक शिक्षणातही राज्य स्वयंपूर्ण व्हायला हवे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.


हेही वाचा