पारंपरिक मूर्तीकारांना १ कोटींचे अनुदान वाटप

हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आर्लेकार यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
पारंपरिक मूर्तीकारांना १ कोटींचे अनुदान वाटप

पणजी : गोव्यातील पारंपरिक चिकणमातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवणाऱ्या सुमारे ३०० कारागिरांना १ कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात आले आहे. गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अनुदान महामंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर कारागिरांना ते वेळेत दिल्याचे आर्लेकर यांनी यावेळी सांगितले.
पणजी येथील महामंडळाच्या कार्यालयात चिकणमातीपासून गणेश‍मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांना अनुदान देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर्लेकर यांच्यासह महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अजय गावडे उपस्थित होते.
गोव्यात मूर्ती कारागिरांची संख्या दुप्पट करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सर्वांना सरकारी नोकऱ्या देणे शक्य नाही. त्यामुळे कलाकारांनी कलेचा वापर स्वतःचे उत्पन्न निर्माण करण्यासाठी करावा. गोव्यात जे मूर्ती कारागीर आहेत त्यांचे जीवन समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे आर्लेकर यांनी यावेळी सांगितले.
मूर्तीकारांना बराच काळ मदत आणि कला विक्रीसाठी कोणताही आधार नव्हता. मात्र, आता गोव्यातील कलाकारांसाठी दोन स्टॉल तयार करण्यात येत असून जिथे त्यांच्या कलाकृती कोणत्याही शुल्काशिवाय आणून ते विकू शकतील. सर्व कलाकारांनी महामंडळाशी संपर्क साधावा त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आम्ही मदत करू, असेही आर्लेकर म्हणाले.
मूर्तीकारांना यापूर्वी कधीही वेळेवर अनुदान मिळाले नव्हते. त्यांचे पैसे पुढील चतुर्थीपर्यंत अडकून राहत असत. आता १२ तालुक्यांमध्ये सुमारे १ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. काही अनुदाने थेट बँकांमध्ये जमा करण्यात आली आहेत, तर काहींना धनादेश देण्यात आले आहेत. याचा फायदा सुमारे ३०० कलाकारांना झाल्याचे अजय गावडे यांनी सांगितले.
चिकणमातीच्याच मूर्ती घ्या : आर्लेकर
पर्यावरणाच्या रक्षणासाठी यापुढे चिकणमातीच्याच गणेशमूर्ती विकत घ्या. महाराष्ट्रातून येणाऱ्या पीओपी मूर्तींवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल आणि छापे टाकले जातील. मूर्तींसाठी लागणारी माती मळण्यासाठी किमान ६० यंत्रे दिलेली आहेत. या यंत्रांमुळे हजारो रुपये मोजावे लागणाऱ्या कामगारांचे दैनंदिन वेतन कमी होणार आहे, असेही आर्लेकर म्हणाले.

पीओपी मूर्ती विकणाऱ्यांवर छापे टाकणे आणि त्यांना दंड करणे ही प्रदूषण मंडळाची जबाबदारी आहे. हस्तकला महामंडळाला कारवाई करण्याचा अधिकार नाही. मात्र, महामंडळ आणि प्रदूषण मंडळ मिळून पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करतील. _ अजय गावडे, हस्तकला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक

हेही वाचा