राज्यात चिकनचा पुरवठा होणार सुरळीत

चंदगड, गोव्यातील व्यावसायिकांची आज बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
राज्यात चिकनचा पुरवठा होणार सुरळीत

पणजी : चंदगडमधील चिकन पुरवठादार आणि गोवा पोल्ट्री असोसिएशनमधील वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंदगडच्या व्यावसायिकांनी आमच्या अटी मान्य करण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही संघटना शुक्रवारी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी एकत्रित येणार आहेत. त्यानंतर राज्यातील चिकनचा पुरवठा सुरळीत होईल, असे अखिल गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक यांनी सांगितले.
चंदगडमधून चिकन पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांवर गोवा हद्दीत काही निर्बंध लादण्यात आल्यामुळे चंदगड आणि गोव्यातील व्यापारी संघटनांमध्ये वाद झाला. त्यामुळे चंदगडमधील व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून राज्यात चिकनचा पुरवठा थांबवला होता. त्यामुळे गेल्या रविवारी बाजारात चिकनचा तुटवडा निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी आणि पुरवठा पूर्ववत करण्यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सदर वाद सोडवण्यासाठी दोन्ही संघटनांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
या प्रकरणाबाबत विचारले असता नाईक म्हणाले, गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. आम्ही आमचे मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले असून त्यांच्या निर्देशानुसार फोंडा येथील व्यापारी संघटना आणि चंदगड संघटना शुक्रवारी बैठकीसाठी एकत्र येणार आहेत.
दरम्यान, शुक्रवारच्या बैठकीनंतर चंदगडहून चिकनचा पुरवठा सुरळीत केला जाईल. राज्यात दररोज ७० टन चिकनची विक्री होते. कर्नाटक आणि इतर भागांतून चिकनचा पुरवठा होत असल्यामुळे गोव्यात चिकनचा तुटवडा भासलेला नाही, असेही नाईक यांनी सांगितले.

चंदगड येथून येणारे चिकन हे उच्च दर्जाचे येत नसून तेथील कोंबडी रोगट असतात. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना आमच्या संघटनेचे नियम समजावून सांगण्यात आले असून ते स्वीकारण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. - जयकृष्ण नाईक, अध्यक्ष, गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड असोसिएशनचे 

हेही वाचा