पर्येतील भूमिका मंदिराच्या परिसरात तणावपूर्ण शांतता

पारंपरिक गवळण काला साजरा : पोलीस बंदोबस्तात भाविकांचे देवदर्शन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पर्येतील भूमिका मंदिराच्या परिसरात तणावपूर्ण शांतता

पर्ये येथील भूमिका मंदिर परिसरात ठेवण्यात आलेला कडक पोलीस बंदोबस्त.


वाळपई :
पर्ये येथील भूमिका देवस्थानाचा पारंपरिक कालोत्सव साजरा करताना बुधवारी गावकर, राणे व माजीक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. यामुळे देवस्थानच्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली‌ होती. पोलीस बंदोबस्तामध्ये दुपारनंतर पारंपरिक कालोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी दुपारी पारंपरिक गवळण काला साजरा करताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी व विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्राप्त माहितीनुसार, गावकर महाजन गटाच्या कोणीही या पारंपरिक कालोत्सवांमध्ये सहभागी झाले नाही. सध्यातरी वाद निवळला असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अजूनही पर्ये भागामध्ये तणावाचीच परिस्थिती आहे.
वाळपई पोलिसांनी आतापर्यंत ३८ जणांवर हिंसा करणे, दगडफेक करणे, खुर्च्या फेकणे व भागांमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी जबाबदार असलेल्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आणखी अनेकांवर वरील आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, दुपारी ३.३० वा. पारंपारिक गवळण काला निश्चित करण्यात आला होता. यामुळे पुन्हा एकदा महाजन गटांतर्फे हक्कावरून वादावादी होऊ नये याची विशेष दखल घेण्यात आली होती. पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी या ठिकाणी प्रत्यक्षपणे पहारा देत होते.
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात; पोलीस उपधीक्षक दळवी
डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी भूमिका देवस्थानच्या परिसरामध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे म्हटले आहे. सध्या तरी कोणत्याही प्रकारचा तणाव नाही. गुरुवारी साजरा करण्यात आलेला गवळण काला उत्साहात पार पडला. यावेळी देवदर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविक रांगेत उभे होते. सर्वत्र शांततामय वातावरण असल्याचा दावा दळवी यांनी केला.      

हेही वाचा