कॅनेडी अफान्सो यांचा आरोप : कोकणीच्या पाचही लिपींना एकत्र आणण्याचा हेतू
मडगाव : देवनागरी कोकणी वापरणार्यांची संख्या ही केवळ १२ टक्के असल्याचे अभ्यासाअंती समजून आलेले आहे. इतर सर्व रोमी, कन्नड, मल्याळम व पर्सो-अरेबिक लिपीतील आहेत. मात्र, देवनागरी कोकणीचे वापरकर्ते कमी असूनही त्यांनी कोकणी परिषदेचे आयोजन केले. या कोकणी परिषदेचा उद्देश इतर कोकणी लिपींना संपवणे हाच होता, असा आरोप ग्लोबल रोमी लिपी अभियानचे अध्यक्ष कॅनेडी अफान्सो यांनी केला.
मडगाव येथे पत्रकार परिषद घेत अफान्सो यांनी सांगितले की, सर्व कोकणी संस्था, कोकणीसाठी काम करणार्यांना एकत्र करण्यासाठी ग्लोबल रोमी लिपी अभियान या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली. देवनागरी वगळता इतर लिपी वापरणार्यांची संख्या जास्त असली तरी त्यांच्यात एकजुटता नाही. त्यामुळे कोकणीच्या पाचही लिपींना एकत्र आणण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी मंगळुरुमध्येही बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी सर्व लिपींचा समावेश असलेली महासभा घेण्याचे आयोजन केले होते.
पण महासभेच्या आयोजनावेळी ग्लोबल कोकणी फोरमच्या काही सदस्यांनी काही संस्थांना आमंत्रण देण्यावरुन विरोध दर्शवला व आपापसात मतभेद झाले. त्यामुळे नव्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. केवळ देवनागरी कोकणी भाषेला पुढे करण्यात आल्याने कोकणी भाषा वापरणारे दुसर्या भाषेकडे वळत आहेत. त्यामुळे जगभरातील सर्व कोकणी भाषिकांना एकत्र आणले जाईल व या संस्थेच्या मााध्यमातून रोमी कोकणीची चळवळ पुढे नेण्यात येईल. यात सर्वांना एकत्र घेऊन काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.