माजी आमदार परशुराम कोटकर यांचे निधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th January 2025, 12:28 am
माजी आमदार परशुराम कोटकर यांचे निधन

पेडणे : माजी आमदार परशुराम कोटकर (वय ७५) यांचे शुक्रवारी सकाळी बांबोळी येथील गोमेकॉत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र कमलेश कोटकर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

बुधवार, दि. १५ रोजी परशुराम कोटकर यांचा रक्तदाब वाढला व त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने बांबोळी येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९९४ मध्ये ते पेडणे मतदारसंघातून मगो पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदार झाले होते.

परशुराम कोटकर हे बहुजन समाजाचे बुलंद आवाज होते. मगो पक्ष हा बहुजन समाजाच्या हातात असावा, असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, ते स्वप्न पुरे झाले नाही. पक्षाचे निष्ठावंत अशी त्यांची संपूर्ण गोवाभर ओळख होती. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कदापि भरून निघणार नाही. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे कठीण आहे, अशी श्रद्धांजली माजी आमदार नरेश सावळ यांनी वाहिली.

नेहमीच ते आपल्याला मार्गदर्शन करायचे. आपल्या वडीलासमान आपण त्यांना मानत होतो, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, डॉ. देविदास शिरोडकर, श्रीधर मांजरेकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

हेही वाचा