राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधक आक्रमक, मार्शल्सनी काढले बाहेर

पणजी: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. बर्च क्लब दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्याच्या आणि त्यावरील चर्चेच्या मागणीवरून विरोधी आमदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी सभापतींच्या हौदात धाव घेतल्याने, अखेर मार्शल्सना बोलावून सर्व विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

सोमवारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अभिभाषणाला सुरुवात करताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. बर्च दुर्घटनेत ज्या २५ निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्यासाठी एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, राज्यपालांनी आपले भाषण सुरूच ठेवल्याने संतापलेल्या विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. बर्च दुर्घटनेतील मृतांना न्याय देण्याची मागणी करणारे फलक हातात घेऊन विरोधकांनी सरकारचा निषेध केला आणि सभापतींच्या हौदात धाव घेतली.

सभापतींनी विरोधी आमदारांना वारंवार आपल्या जागेवर बसण्याची विनंती केली, परंतु गदारोळ न थांबल्याने त्यांनी मार्शल करवी विरोधकांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर युरी आलेमाव, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकोस्टा, वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा आणि विरेश बोरकर या सर्व आमदारांनी विरोधी पक्ष कक्षात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना युरी आलेमाव यांनी बर्च दुर्घटनेला 'सरकारने केलेला खून' असे संबोधले. ते म्हणाले की, सरकारकडून देण्यात आलेली 'स्क्रिप्ट'च राज्यपाल वाचत आहेत. या प्रकरणात केवळ हडफडेचे सरपंच, सचिव आणि इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. वास्तविक या दुर्घटनेसाठी पंचायत मंत्री, पर्यावरण मंत्री आणि गृहमंत्री यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, असा गंभीर आरोप आलेमाव यांनी केला. या गोंधळामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला.