चिंचणीवासीयांचा इशारा : भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

मडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) चिंचणी येथे बायपासची मागणी करण्यात आलेली असतानाही फ्लायओव्हर (Flyover) उभारणी केली जात आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी चिंचणीतील (Chinchinim) नागरिक एकत्र आले होते. सरकारने (Government) भूमिका स्पष्ट करावी. बायपासची मागणी पूर्ण होत नसल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा स्थानिकांनी दिलेला आहे.
चिंचणी, दांडोवाडा येथे चिंचणीचे नागरिकांनी एकत्र येत मुख्य रस्ता रुंदीकरण करून रस्ता नको तर बायपास उभारण्याची मागणी केली. यावेळी आमदार क्रुझ सिल्वा, सरपंच फ्रँक व्हिएगस यांच्यासह स्थानिक उपस्थित होते. सरपंच फ्रँक यांनी सांगितले की, २००७ पासून सर्वेक्षणानंतर या प्रश्नाला सुरूवात झाली. लोकांच्या विरोधानंतर २०१० मध्ये सरकारने बायपास करण्याचे आश्वासन दिले. सर्वेक्षणानंतर मॅपिंगही झाले होते. कुणालाही न सांगता २०१७ मध्ये सरकारने पुन्हा बायपासचा पर्याय वगळून मुख्य मार्गाने रस्ता करण्याचे ठरवले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटल्यानंतर त्यांनीही बायपास करण्याचे मान्य केले होते. ११ किलोमीटर बायपास नको तर केवळ दोन किलोमीटर अंतराचा बायपास करण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. बायपाससाठी कोमुनिदादचा ना हरकत दाखला घेतलेला आहे. मात्र, तरीही सरकार याच मार्गावर फ्लायओव्हर करू पाहत असल्याने अनेक अडचणी स्थानिकांना येणार आहेत. त्यामुळे सरकार बायपास करणार नसल्यास लोकांना रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा दिला.
राष्ट्रीय महामार्ग ६६ याची वस्तुस्थिती बांधकाम खात्याने जाणून घेण्याची गरज आहे. राज्य सरकारने ठरवल्यास हा बायपास होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार ना हरकत दाखलाही केला. आमदार, खासदार यांच्याकडे निवेदने सादर केलेली आहेत. चिंचणीतील लोकांना होणारा त्रास लक्षात घेत फ्लायओव्हन नको तर बायपास करण्यात यावा, अशी मागणी सरपंच फ्रँक व्हिएगस यांनी केली.
या बायपासच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यांच्या सांगण्यानुसार बायपाससाठी कोमुनिदादचा ‘ना हरकत’ दाखलाही आणला. मंत्री दिगंबर कामत यांच्याकडेही निवेदन सादर केलेले आहे. अधिवेशनात हा प्रश्न मांडणार. चिंचणी नागरिकांची एकत्रित बैठक घेत या प्रश्नावर सरकारने भूमिका स्पष्ट करण्यात यावी. जी भूमिका लोकांची, पंचायतीची असेल त्याला आपला पाठिंबा असेल, असे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.