मडगाव रवींद्र भवनात स्वामी विवेकानंदांचे स्मारक व्हावे

मंत्री कामत : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मडगावात सोहळा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
मडगाव रवींद्र भवनात स्वामी विवेकानंदांचे स्मारक व्हावे

मडगाव : स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचे एक स्मारक गोव्यात (Goa) असावे अशी मागणी होत आहे. त्यानुसार मडगाव रवींद्र भवन (Margao Ravindra Bhavan) परिसरात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी म्हटले. तसेच युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श बाळगावा, असेही सांगितले.

रवींद्र भवन, मडगाव यांच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या १६३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी सकाळी स्वामी विवेकानंद केंद्र व खाप्रुमाम पर्वतकर परिषदगृह, रवींद्र भवन, मडगाव येथे केले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मनोहर बोरकर, सदस्य सचिव आशा हरमलकर, योगिराज कामत, राजेंद्र तालक उपस्थित होते. या प्रसंगी अ‍ॅड. सिद्धी एम. पारोडकर, डॉ. आकाश ए. रिंगणे, शुभम नाईक, अर्जुन फळारी, कल्पिता एस. नाईक, निलय नाईक या युवकांना ‘यंग अचिव्हर पुरस्कार २०२६ने गौरवण्यात आले. 

यावेळी मंत्री कामत यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद यांची जयंती देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे नाव त्यांनी जगभरात पोहोचवले. युवकांना सध्या आदर्श असत नाहीत त्यामुळे ते भरकटत जातात. त्यांचा वापर कुणीतरी करून घेते. त्यामुळे विवेकानंद यांच्या कार्याची माहिती घेत त्यांचा आदर्श सध्याच्या पिढीने घ्यावा, असेही सांगितले.

 दामू नाईक यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद हे तरूणाचे गुरु व आदर्श आहेत. वेद, अध्यात्म यांचे महत्व जगाला पटवून दिले. अवघ्या ३९ वर्षांच्या जीवनात त्यांनी देश, धर्म व आध्यात्मिक कार्य जगभरात पोहोचवले व भारतीय संस्कृतीला मान मिळवून दिला. त्यांनी गोव्यातही येत राशोल सेमिनारीत ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केलेला आहे. मुलांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तके वाचावीत, असेही आवाहन केले.  यानंतर विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी - गोवा शाखा यांचे राज्य संयोजक वल्लभ लक्ष्मण केळकर यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व विचारांवर आधारित प्रेरणादायी व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती हजारे यांनी केले.

हेही वाचा