कोलवाळ कारागृहात चरस, तंबाखू आणि २६ मोबाईल जप्त

अज्ञात कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
कोलवाळ कारागृहात चरस, तंबाखू आणि २६ मोबाईल जप्त

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कारागृह प्रशासनाने शनिवारी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये २६ मोबाईल फोनसह ३० ग्रॅम चरस, ९ हजार रुपये किमतीचा तंबाखू आणि इतर प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून कोलवाळ पोलिसांनी अज्ञात कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी कारागृहाचे उपअधीक्षक (जेलर) महेश यांनी तुरुंग प्रशासनातर्फे पोलिसांत तक्रार दाखल केली. शनिवारी १० जानेवारी रोजी दुपारी २:५५ ते सायंकाळी ६:०५ या वेळेत तुरुंग प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त मोहिमेअंतर्गत ही छापेमारी केली होती.

नुकतीच गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कोलवाळ कारागृहातील कैद्यांकडून होणाऱ्या मोबाईल फोनच्या वापराची गंभीर दखल घेत प्रशासनाचे कान टोचले होते. तसेच कारागृहात मोबाईलचा वापर होऊ नये, यासाठी कडक आदेश जारी केले होते. एका कुख्यात गँगस्टरचा कारागृहातील कैद्यांशी संपर्क असल्याचे उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

तुरुंग महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांच्या मार्गदर्शनाखाली तुरुंग अधीक्षक सुचिता देसाई, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर, आयआरबी पोलीस अधीक्षक विश्राम बोरकर, उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि अन्य वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली कोलवाळ, म्हापसा, हणजूण व आयआरबी पोलिसांनी कारागृहातील सर्व विभागांची झडती घेतली.

या झडतीत विविध कक्षांमध्ये (सेल) लपवून ठेवलेले २६ मोबाईल फोन, ३० हजार रुपये किमतीचा ३० ग्रॅम चरस आणि तब्बल ९ हजार रुपयांचा तंबाखू सापडला. रविवारी ११ जानेवारी रोजी तुरुंग प्रशासनाने हे साहित्य आणि लेखी तक्रार कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS), सार्वजनिक आरोग्य आणि तुरुंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे, चालू महिन्याच्या सुरुवातीलाच प्रशासनाने घेतलेल्या झडतीत ८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते.


हेही वाचा