नुवेत भरदिवसा घरफोडी, तीन लाखांचा ऐवज लंपास

घरातील मंडळी चर्चमध्ये प्रार्थनेला गेली असताना चोरट्यांनी साधली संधी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
नुवेत भरदिवसा घरफोडी, तीन लाखांचा ऐवज लंपास

मडगाव: नुवे येथील सॅन्ड्रा गुदिन्हो यांच्या घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. घरातील मंडळी चर्चमध्ये प्रार्थनेला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तूंंसह सुमारे ३.१० लाखांचा ऐवज लंपास केला. मायना-कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

रविवारी सकाळी ८ ते दुपारी १२ च्या सुमारास गुदिन्हो कुटुंबीय प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. यावेळी चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला आणि चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच मायना-कुडतरी पोलिसांनी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक गौरव नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच मडगाव येथे भरदिवसा एका वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरल्याची घटना घडली होती. तसेच नावेली येथेही नाताळच्या रात्री अशीच घरफोडी झाली होती. सासष्टी तालुक्यात भरदिवसा चोरीच्या घटना वाढत असून, पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


हेही वाचा