गोवा : एचआयव्ही, एड्स बाधितांनी आपला आजार लपवून ठेवू नये : श्रीपाद नाईक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
7 hours ago
गोवा : एचआयव्ही, एड्स बाधितांनी आपला आजार लपवून ठेवू नये : श्रीपाद नाईक

पणजी : एचआयव्ही किंवा एड्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक नवीन औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे एच आय व्ही किंवा एड्स बाधितांनी आपला आजार लपवून ठेवू नये असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. शनिवारी पणजी येथे आयोजित राष्ट्रीय रेड रन २.० च्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. वंदना धुमे, डॉ. ललिता हुम्रसकर, केंद्रीय सचिव व्ही एच झीमोमी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार देशात सुमारे २५ लाख एचआयव्ही बाधित आहेत. असे असले तरी अजून सुमारे दहा ते पंधरा टक्के लोक एचआयव्ही बाधित असूनही उपचारासाठी पुढे आलेले नाहीत. एड्स हा काही वैयक्तिक प्रश्न नसून तो जागतिक प्रश्न आहे. कधी काळी एचआयव्ही किंवा एड्स ने जगभर हाहाकार माजवला होता. या रोगाला बरे करणारे करणारे औषध अजून तयार झालेले नाही. असे असले तरी आता एड्स नियंत्रणात ठेवणारी आधुनिक औषधे, उपचार पद्धती उपलब्ध आहेत. 

यामुळेच एचआयव्ही बाधितांनी लपून न राहता पुढे येणे आवश्यक आहे. असे झाले तरच त्यावर उपचार करता येतील. आज देशातील आणि राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. यासाठी एचआयव्ही रुग्णाला पुढे येऊन उपचार घेण्याबाबत आपण जागृत केले पाहिजे. आज आपला देश पोलिओ मुक्त आहे. पुढील काही वर्षात टीबी मुक्त भारत करण्याचे ध्येय आहे. येत्या काही वर्षात विविध संशोधने होऊन देश एड्स मुक्त होईल असा आमचा विश्वास आहे. 

तानावडे म्हणाले की, पूर्ण देश एड्स मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय रेड रन सारखे कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहेत. गेल्या काही वर्षात गोवा राज्यात एड्स नियंत्रणात येत आहे. आता आपण संपूर्ण देशात एड्स नियंत्रणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी विशेष करून युवा वर्गात अधिकाधिक जागृती झाली पाहिजे. आमचे सरकार देखील एड्स नियंत्रणासाठी विविध औषधे उपलब्ध करून देत आहे.

हेही वाचा