अपघातास कारणीभूत संशयितास अटक; चारचाकी जप्त
साखळी : आमोणा पुलाजवळ रस्त्याच्या बाजूला घडलेल्या "हिट अँड रन" घटनेत गंभीर जखमी झालेल्या माशेल येथील शांबा तारी या खेकडे विक्री करणाऱ्या मासळीविक्रेत्याचे बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. १७ जाने.) रात्रीच निधन झाले. या घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या पाडेली, भिरोंडा-सत्तरी येथील नवीन गावडे याला डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंदवत रीतसर अटक केली. तसेच निळ्या रंगाची जीए ०३ सी १५३५ ही व्हेगन आर कार जप्त केली.
सदर घटना शुक्र. दि. १७ जाने. रोजी संध्या. ५.३० वा. च्या सुमारास घडली. आमोणा येथील पुलाजवळ रस्त्याच्या बाजूला खेकडे विक्री करणाऱ्या माशेल येथील शांबा तारी यांना एका निळ्या रंगाच्या वाहनाने धडक देऊन पळ काढला होता. या धडकेत शांबा तारी हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांना तातडीने उपचारार्थ बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांचे रात्री निधन झाले.
या अपघातास निळ्या रंगाची कार कारणीभूत असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी कारचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात सदर कारची फुटेज पोलिसांना सापडताच त्यांनी कारची नोंदणी व मालकाचा शोध घेतला. यानंतर नवीन गावडे यास अटक केली.